श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प शेहेचाळीस - माधव कुलकर्णी

शेगांव (वि.प्र.) - शेगावच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर चिंचोली हे एक लहानसे खेडेगाव आहे. माधव कुलकर्णी तेथीलच एक रहिवासी. त्याने आपले तारुण्य यथेच्छपणे जगले. त्यावेळी केवळ संसार हेच त्याचे ब्रह्म होते. त्याला कधीही ईश्वराची आठवण झाली नाही. संसारसुख हेच त्याच्या दृष्टीने शाश्वत सुख होते. अशा भरलेल्या संसारातून एके दिवशी त्याची बायको इहलोक सोडून गेली. मुले सुद्धा अल्पावधीतच जग सोडून गेली. त्याला घर संसार स्मशानवत भासू लागले. मन विरक्त झाले. जे चित्त पूर्वी संसारात आसक्त होते, ते संसार संपल्याने विरक्त झाले. वय जवळजवळ साठ वर्षाचे झाले होते. आता आपले उर्वरित जीवन कसे व्यतीत होईल, हाच विचार त्याच्या मनात सतत बोचू लागला. अशा विचारात तो एके दिवशी शेगावला गजानन महाराजांकडे आला. 
महाराजांचा मुक्काम तेव्हा बंकटलाल अग्रवाल याच्या घरी होता. माधव कुलकर्णी बंकटलालच्या घरी आला आणि समर्थांजवळ बसला. महाराजांच्या पाया पडून "माझ्यावर कृपा करा" असे त्यांना विनवू लागला. महाराज काहीही बोलले नाही. त्याने "नारायण नारायण" असा जप सुरू केला असे तीन दिवस गेले. आता त्याच्या परीक्षेची वेळ आली होती. रात्री सर्वजण झोपी गेले होते. काळोख पसरला. महाराजांनी महारुद्र असे भयंकर रूप धारण केले. महाराजांचे ते भयानक रूप पाहून माधव घाबरला आणि जिवाचा आकांत करीत ओरडू लागला. त्याचा आक्रोश ऐकून सर्वजण झोपेतून उठून त्याच्याभोवती जमा झाले. त्याची बोबडी वळली होती. शरीर घामाघुम झाले होते.
सर्वांनी महाराजांजवळ आता जाऊन बघितले तर त्यांना महाराज पूर्ववत ब्रह्मानंदी तल्लीन होऊन शांतपणे बसलेले दिसले. सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन पुन्हा पहुडले. तेव्हा भयभीत झालेल्या माधवाला महाराज म्हणाले, "माधवा हेच का रे तुझे धीटपण ? तू काळाचा भक्ष्य कसा होशील, याची चुणूक तुला दाखवली." महाराजांचे हे बोलणे ऐकून माधव म्हणाला, "महाराज, यमलोकाची गोष्टही नको. माझ्या पातकांच्या राशी अगणित आहेत. माझ्या पूर्वजन्मीचे काही सुकृत होते म्हणूनच मला आपले दर्शन घडले. आता उरलेले जीवन जगण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा मला वैकुंठात धाडून द्या. एवढीच माझी आपल्या चरणांपाशी विनंती आहे."
महाराजांनी माधवावर कृपा केली आणि त्याच्या पापाचा नाश केला. त्याला जन्ममरणाच्या चक्रातून सोडवले.
महाराजांनी त्याला ब्रह्मसाक्षात्कार करवून दिला आणि त्याला मोक्ष दान दिले होते. 
महाराजांचा संसार करण्याला विरोध नाही तर आसक्तीला विरोध आहे. संसाराची सुरुवात जशी आनंदाने केली जाते, तसा त्याचा शेवटही सुखात आणि आनंदमय करता आला पाहिजे. आपण संसारात अडकून पडतो, त्यातून सही सलामत निघण्याची एकही वाट आपण शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे आपल्याला त्यातून निघता येत नाही.
संसार हे ब्रह्मकार्य आहे. ब्रह्मास इच्छा झाली, "एकोहम् बहुस्याम्" म्हणजे मी अनेक रूपाने नटावे. एकट्याने अनेक व्हावे. हीच तर गृहस्थधर्म, संसार आणि प्रपंचाची मुख्य आधारशीला आहे. सगुण, जड आणि चेतन अशी सृष्टी हा त्या निर्गुण निराकार ब्रह्माचा संसार आहे. मात्र आपण संसार करतो तो आपला समजून. ईश्वराच्या या संसारावर आपण आपले अधिपत्य प्रस्थापित करू पाहतो.
प्रपंचाचे दास न होता, जो या प्रपंचाचा मुलाधार आहे त्या परमेश्वराचे दास होणे चांगले. मग दुःखाचे भय राहत नाही. त्याला जे मान्य आहे तेच घडत आहे. माझे दुःख त्याला मान्य आहे. माझे सुख त्याला मान्य आहे. त्याचीच तशी इच्छा आहे. मग आपली इच्छा आणि शक्ती तेथे खर्च करून काहीही उपयोग होणार नाही. जे पदरी आहे ते आनंदाने स्वीकारण्यातच पुरुषार्थ आहे.
आपण देह, बुद्धी आणि मन याच्या पलीकडील आहोत. जेथे देहाची मनाची आणि बुद्धीची सर्व बंधने तुटून पडतात तेथे केवळ साक्षीभाव आहे, ही विवेकबुद्धी निर्माण झाली पाहिजे. असा साक्षीभाव जर प्राप्त झाला तर जीवन संसारही शाश्वत होईल.
माधव कुलकर्णी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.