शेगांव (वि.प्र.) - चंद्रभागाबाई ही रामचंद्र पाटील यांची ज्येष्ठ कन्या. तिचा जन्म सन १९१४-१५ च्या सुमारास झाला. अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील भदोजी गंगाराम बोंद्रे यांच्याशी तिचा विवाह झाला. बोंद्रे घराणे धनसंपन्न होते.
वयाच्या अठराव्या वर्षी चंद्रभागाबाई गरोदर असताना रितीरिवाजाप्रमाणे आपल्या माहेरी शेगावी बाळांतपणासाठी आली. या गरोदरपणात तिच्यावर मोठा दुर्धर प्रसंग ओढवला. तिची प्रसूती फार कष्टाने झाली. त्यात तिला ताप आला. डॉक्टरांनी सर्व उपाय केले. विविध औषधे झाली. परंतु रोग पूर्णपणे बरा होईना. ती वारंवार आजारी पडू लागली. शेवटी रामचंद्र पाटलांनी विचार केला की आता आपला वैद्य म्हणजे गजानन महाराज. तोच हिला तारेल किंवा मारेल. त्यांनी चंद्रभागाबाईला महाराजांचा अंगारा आणि तीर्थ, औषध म्हणून दररोज देणे सुरू केले. संपूर्ण भार महाराजांवर सोपवला. महाराजांच्या तीर्थ अंगाऱ्याने मुलीला गुण आला. जी अंथरुणात उठून शकत नव्हती, ती थोड्याच दिवसात स्वतः चालत महाराजांच्या मठात दर्शनाला आली. अशाप्रकारे महाराजांच्या अंगाऱ्याने आणि तीर्थाने किमया केली.
येथे खऱ्या निष्ठेची गरज आहे. या निष्ठेसाठी बुद्धिमत्ता नको, शिक्षण नको; फक्त शुद्ध अंतःकरण पाहिजे. आपण सतत बुद्धीचातुर्याचा प्रयोग करीत असतो. श्रद्धेमध्ये चातुर्य चालत नाही. श्रद्धा पारदर्शक असणे अगत्याचे आहे. श्रद्धा म्हणजे समर्पण. श्रद्धा म्हणजे मन, बुद्धी, अंत:करण हे सर्व उपास्याच्या पायी अर्पण करणे. अशी श्रद्धा ज्या भक्ताजवळ आहे, त्याला कृपा प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. खऱ्या संतांसाठी काहीही अशक्य नसते. त्यांच्यावर अंतःकरणापासून भरवसा टाकल्यास ते आपल्याला सांभाळतात. हे सत्य आहे तशी सबुरी भक्तास ठेवावी लागते.
चंद्रभागाबाई यांनी महाराजांची भक्ती करणे कधीही सोडले नाही. सन १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.
चंद्रभागाबाई आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.