शेगांव (वि.प्र.) - पुरुषोत्तम जाऊरकर यांचा जन्म सन १८९९ मध्ये झाला.डॉक्टर गोविंद विठ्ठल गाढे यांच्या मुलीच्या लग्नात पुरुषोत्तम जाऊरकर वडिलांसोबत गेले होते. त्यावेळी ते पाच सहा वर्षाचे होते. गजानन महाराज लग्नात आलेले असताना डॉक्टरांनी त्यांची पूजा केली आणि पिठलं भाकरीचा नैवेद्य त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. त्यावेळी गजानन महाराजांनी या लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून नैवेद्याचा एक घास त्याला भरवला.
गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाच्या बळावर पुरुषोत्तम जाऊरकर पुढे इंजिनियर झाले. पुरुषोत्तम जाऊरकर हे वारकरी घराण्यात जन्माला आलेले. त्यांचे सतत आळंदी आणि पंढरपूर येथे जाणे असे. त्यांच्या घराण्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कुळातील मुलगी दिली होती. त्यांची आई रखमाबाई ही त्या घराण्यातील होती. त्यांच्याकडे ६०० वर्षांपूर्वीची हस्तलिखित ज्ञानेश्वरी होती. ही प्रत म्हणजे ज्ञानेश्वरीची दुसरी आवृत्ती होती. पुरुषोत्तम जाऊरकर यांनी ही ज्ञानेश्वरी जतन केली. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्राणपणाने पुरस्कार केला. इंजिनीयर असल्याने त्यांच्या हातून मोठ-मोठी कामे झाली.
पुरुषोत्तम जाऊरकर आणि त्यांचे नातू मधुकर पाठक यांच्या घरी पुंडलिक भोकरे आणि डॉक्टर भाऊ कवर बरेच वेळा जात असत. सन १९५० पासून त्यांनी गजानन महाराजांचा उत्सव घरी साजरा करण्यास सुरुवात केली. वर्ध्यातील रामनगर येथे यांचे खाजगी मंदिर आहे. तेथे उत्सव साजरा केला जाऊ लागला. पुरुषोत्तम जाऊरकर यांचे दिनांक २८/०१/१९८४ रोजी निधन झाले.
पुरुषोत्तम जाऊरकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.