तीस वर्षांच्या भावना ओसंडून वाहल्या .!
भद्रावती (ता.प्र.) - कधी भावनांचा आवेश होता. तर कधी आनंदाचा कल्लोळ. एका डोळ्यात आनंदाश्रू, दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू.
तीस वर्षानंतर एकत्रित आलेल्या 35 माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचा हा प्रसंग होता. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे 1994 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन आयोजित करण्यात आले होते.
त्याप्रसंगी 35 विद्यार्थी आणि सरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करत असताना सभागृह कधी भावुक होत होते, तर कधी आनंदी होत होते. काही विद्यार्थी आपल्या चेहऱ्यावरील , डोळ्यातील हावभाव लपवण्याचा प्रयत्न करत होते . पण कॅमेऱ्याने मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हावभाव व डोळ्यातले अश्रू अलगदपणे टिपले . एक वेळ तर अशी आली की कॅमेरेच गहिवरून गेले होते. कधी मुसमुसले, कधी गहिवरले अशी सगळ्यांची त्या ठिकाणी परिस्थिती होती.
थोडेसे प्रेम, थोडासा जिव्हाळा, थोडीशी आपुलकी आणि थोडीशी विचारपूस याशिवाय जीवनात आणखी काय हवं? आणि या गोष्टींचे जर मिलन झाले तर मग विचारायलाच नको. हाच प्रत्यय माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यातून आला. आणि याच प्रसंगी ऋणाणुबंधाच्या जिथून पडल्या गाठी,भेटीत तृष्ठता मोठी या ओळींचा खरा अर्थ समजला. स्थानिक लोकमान्य तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या सभागृहात संस्थाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य आशालता सोनटक्के, सहसचिव अमित गुंडावार, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे, प्रा.विलास कोडगिरवार, प्रा.सुरेश परसावार, प्रा. स्वाती गुंडावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रमले सहवासात: गुंतले आपापसात .!
काय ग कुठे राहतेस आता? काय करतात तुझे हे? काय करतात मुलगा, मुलगी? बापरे किती दिवसांनी भेटलो.
ये, तुझ्यात किती फरक पडला? अरे तू आत्ताही तसाच दिसतोय, दिसते, काहीच फरक नाही चेहऱ्यात.
अबे क्या बात है? कुठे करतोस नोकरी? केस फारच विरळ झाले बे! पहिले फारच दाट होते. प्रत्येक मित्र मैत्रिणींनी एकमेकांना उद्देशून केलेले व प्रत्येकाच्या तोंडातून निघालेले हे भाष्य होते. संपूर्ण हॉल या आपुलकीच्या विचारपूस करण्यामुळे दणाणून गेला होता. मित्रांचे एकमेकांना आणि मैत्रिणींचे एकमेकांना आलिंगन हाही प्रकार होताच की. आयुष्यात चांगला सहवास किती महत्त्वाचा असतो या सहवासाचं खरं रूप याप्रसंगी समोर आल.
आपण काही वेळ आई-वडिलांसोबत बसलो तर त्यांनी आपल्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होते. तसेच काही वेळ मित्र-मैत्रिणींसोबत बसलो तर स्वर्ग कशाला म्हणतात, त्याची जाणीव होते. हा ही अनुभव सर्व मित्र-मैत्रिणींना याप्रसंगी आला.
आठवणीतल्या आठवणी .!
प्रत्येकाचा सत्कार आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या आठवणी सांगन आणि ऐकन अविस्मरणीय होतं. काहीजणांनी तर त्या काळची शाळाच सर्वांसमोर आणली होती. सर्व शिक्षकांच्या प्रती असलेला आदर या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला व या शिक्षकांमुळेच आम्ही घडलो हे सांगायला एकही माजी विद्यार्थी विसरला नाही.
खेळामुळे बालपण जागे झाले .!
जशी विविध खेळांना सुरुवात झाली तसतसे बालपण आपल्या अंगात संचारले गेले. खेळताना कोणी पडले, कोणी हिरमुसले, ज्यांना बक्षीस मिळाले ते अतिशय आनंदी झाले. पण हा तर खेळाचा भाग होता. या संपूर्ण स्नेह मिलनाचे खरे वास्तव काय असेल तर या स्नेह मिलना पासून सर्व विद्यार्थी भावी आयुष्यासाठी खऱ्या अर्थाने उर्वरित जीवन जगण्याची स्फूर्ती घेऊन गेले.
आयुष्यातील परमोच्च क्षण .!
तीस वर्षानंतर विद्यार्थी एकत्र येतात. आपल्या शाळेच्या आठवणी काढतात. शिक्षकांविषयी बोलतात. त्यातला एक विद्यार्थी म्हणतो, मला या या शिक्षकांनी, या या वर्षी, ही ही कविता इतकी चांगली शिकवली की ती कविता मी आजही विसरू शकलो नाही. मित्रहो इतक्या वर्षानंतर शिकवण्यासाठी ज्या शिक्षकाचे नाव घेतले गेले, हीच आठवण म्हणजे त्या शिक्षकाच्या जीवनातील परमोच्च क्षण आहे. आणि हा क्षण आजच्या या सोहळ्याद्वारे सर्वांनी जोपासला. खरंच कार्यक्रमापासून जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.
आयुष्य काय असतं ते विचारा त्या गरीब फुगेवाल्याला ,ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला श्वास देखील विकावा लागतो. विद्यार्थ्याचे आयुष्याबाबतचे हे वाक्य सर्वांची दाद मिळवून गेले.
कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी गंगाधर बोढे, प्रास्ताविक गजानन नागपुरे यांनी केले. या कार्यक्रमाला पस्तीस माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.