शेगांव (वि.प्र.) - गोपाळराव बुटी यांच्याकडे असताना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ बुटी वाड्यात श्री मृत्युंजय उर्फ बापूसाहेब लाखे (रामटेक) यांच्या कुटुंबीयांनासुद्धा झाला. गोपाळराव हे लाखे यांचे जावई. गजानन महाराजांच्या भक्तीत लाखे कुटुंबसुद्धा होते. महाराजांनी राजे रघुजी भोसले यांच्याकडे असताना रामटेकला जाण्याचा उच्चार केला, "रामटेकला शंकर बुवाला भेटायचं आहे". हे शब्द श्रींच्या मुखातून ऐकताच लाखे यांना अतिशय आनंद झाला. कारण या निमित्याने महाराजांना आपल्या घरी नेऊन आपले घर पवित्र करण्याची त्यांना सहज संधी प्राप्त झाली होती. महाराजांना रामटेक येथे नेण्याची जय्यत तयारी झाली. रामटेक रेल्वे स्टेशन पासून श्रींना गडावर नेण्यासाठी पालखीची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. महाराजांच्या पालखीच्यामागे राजे रघुजी भोसले, गोपाळराव बुटी, सदाशिव लाखे, मृत्युंजय लाखे त्याचप्रमाणे शेगाव वरून आलेली सर्व भक्त मंडळी पायी चालत होती. सर्वजण आनंदाने "श्री गजानन महाराज की जय" असा जयघोष करीत होते. सर्वजण गडावर येऊन पोहोचले.
रामटेकला गजानन महाराजांनी शंकरबुवांना श्रीराम प्रभूंच्या रुपात दर्शन दिले.
रामटेक वरून परतल्यानंतर गजानन महाराज नागपुरात बापूसाहेब लाखे यांच्या वाड्यावर आले. बापूसाहेबांसोबतच त्यांच्या पत्नी द्वारकाबाई होत्या. गजानन महाराज वाड्यात आल्यावर त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. महाराजांना पलंगावर बसवण्यात आले. तो पलंग आणि गादी अजूनही या वाड्यात सुव्यवस्थेतरित्या ठेवलेली आहे. लाखे यांच्याकडे महाराजांचे आगमन म्हणजे ईश्वरभक्ताची इच्छापूर्ती करणे होय. हा वाडा गांधी चौकात असून आजही चांगल्या स्थितीत आहे.
बापूसाहेबांनी श्रींच्या शेगावातील सर्व भक्त मंडळींची अतिशय उत्तम व्यवस्था आणि आदरातिथ्य केले. हरी कुकाजी पाटील यांच्यासोबत बापूसाहेबांनी श्रींच्या अवतारलीलांची चर्चा केली. हरी पाटलांसारखे शेगावातील मातब्बर धनसमृद्ध गृहस्थ गजानन महाराजांच्या सेवेत स्वतःला समर्पित करतात, हे ऐकून बापूसाहेबांना त्यांचा हेवा वाटला. थोर भाग्याशिवाय ही सेवा घडणे शक्य नाही, असे बापूसाहेबांनी बोलून दाखवले.
बापुसाहेब लाखे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.