शेगांव (वि.प्र.) - तुकाराम थानसिंग डाबेराव हे शेगावचे रहिवासी त्यांचा जन्म सन १८८४ मध्ये झाला.
सन १८९४ मधली घटना. तुकाराम हा दहा वर्षांचा मुलगा. मोटे यांच्या शिवमंदिरापलीकडे तो राहायचा. जवळच्या शिवमंदिरात एकादशीचे कीर्तन ऐकायची त्याला बालपणापासूनच गोडी लागली होती. लहानपणी गजानन महाराजांना त्यांनी अगदी जवळून पाहिले.
एक दिवस तुकाराम दुपारी बाहेरू जाऊन घरी परत यायला निघाला होता. ऊन रखरखत होते. एका नाल्याच्या काठाने येण्या-जाण्यासाठी एक पाऊलवाट होती. या रस्त्याने तुकाराम घराकडे यायला निघाला. ही पाऊलवाट जेथून नाल्यात उतरत होती, तेथे काठावर तो येतो न येतो तोच, नाल्यातील पाऊलवाटेला लागून एका भव्य दगडावर त्याला महाराज बसलेले दिसले. त्या दगडाच्या शेजारूनच तलावाच्या पाण्याची नाली मध्यभागी वाहत होती. त्यावेळी हे पाणी शुद्ध असायचे. नाल्याला घाणसुद्धा नव्हती. तलावाचा पाझर सुरू असल्याकारणाने ही नाली स्वच्छ पाण्याने तुडुंब भरून वाहत असे.
तुकाराम नाल्याच्या काठावरून पाहतो तो महाराज त्या भव्य दगडावर भर उन्हात बसलेले होते. वमन क्रिया करून त्यांनी आपली आतडी काढून एखाद्या हाराप्रमाणे गोलाकार करून गळ्यात टाकली होती.
या पाण्यात महाराज आपली आतडी धुऊन तोंडाद्वारे हळूहळू आत टाकत होते. हे सर्व दृश्य पाहून तुकाराम अवाक झाला. तो कुतूहलाने जवळ जाऊन ही क्रिया पहात होता. स्वतःच्या पोटातली इतकी लांब आतडी काढून स्वच्छ धुण्याचा प्रकार हा कल्पनेपलीकडचा आहे आणि त्यात दहा वर्षांचा हा मुलगा. त्याला तर हे सर्व खूपच अप्रूप वाटले.
आपलीच आतडी काढून स्वच्छ धुणे ही एक अतिशय श्रेष्ठ शरीरशुद्धीची योगक्रिया आहे. यावरून महाराजांची श्रेष्ठता कळते. महाराज प्रत्यक्ष योगेश्वर आहेत.
घेरंडसंहितेमध्ये वर्णन केले आहे की, शरीरशुद्धीसाठी शोधन, स्थैर्य, धैर्य, लाघव, प्रत्यक्ष आणि निर्लिप्त अशी सात साधने आहेत. षटकर्माद्वारे लाघव, ध्यानाद्वारे दृढता, मुद्रेद्वारे स्थिरता, प्रत्याहाराद्वारे लाघव आणि ध्यानाद्वारे ध्येयवस्तूचे प्रत्यक्ष दर्शन त्याचप्रमाणे समाधीच्या द्वारा निर्लिप्त-आसक्तीरहीतता अशी क्रमाक्रमाने साधना केल्यास मुक्तस्वरूपावस्था प्राप्त होते.
गजानन महाराज म्हणतात, योग क्रियेत अघटीत गोष्टी घडतात. त्यांचा अर्थ सामान्य लोकांना लागत नाही. या अघटीत गोष्टी लपवण्यासाठी बळेच वेड पांघरून, उपाधी लागू नये म्हणून मी वेडापिसा बनलो.
२५/०९/१९७९ ला वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तुकाराम डाबेराव आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.