शेगांव (वि.प्र.) - स्वामी दत्तात्रेय केदार म्हणजे गजानन महाराजांच्या भक्तांपैकी प्रसिद्धीपासून दूर असलेला एक महान तेजोमणी. स्वामी दत्तात्रय केदार हे उच्चशिक्षित, मोठ्या सरकारी हुद्द्यावर कार्यरत असणारे आणि योगाभ्यासामध्ये अतिशय उच्चत्तम स्तर गाठलेले महाराजांचे निष्ठावंत शिष्य होते.
गजानन विजय ग्रंथात एकोणिसाव्या अध्यायात त्यांचा उल्लेख आला आहे.
स्वामी दत्तात्रय केदार | दुसरा नारायण जामकर | निव्वळ दुधाचा ज्याचा आहार | तो दुधाहारी बुवा || असे श्रोते तिघेजण | स्वामींचे भक्त निर्वाण | ज्यांनी आपले तनमन | समर्थ चरणी अर्पिले ||
त्यांच्या वडिलांचे नाव त्र्यंबकपंत आणि आईचे नाव रुक्मिणी होते. संस्कारक्षम आई-वडिलांच्या पोटी कुरुम (तालुका मुर्तीजापुर) या गावी त्यांचा जन्म झाला. आई-वडिलांप्रमाणे ते धार्मिक आणि तल्लख बुद्धीचे होते. त्यांच्या आईबरोबर लहानपणी ते शेगावी महाराजांच्या दर्शनाला गेले होते. या पहिल्याच दर्शनाने त्यांच्यावर महाराजांची कृपादृष्टी झाली होती.
पुढे ते ग्रॅज्युएट झाले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर ते उपजिल्हाधिकारी पदावर भूम (जिल्हा - सोलापूर) येथे काम करू लागले. स्वामी दत्तात्रय केदार हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. पुढे वडिलांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचा विवाह करण्याचा ठरविले. पहिल्यांदा लग्न ठरले आणि लग्न होण्याआधीच त्या मुलीचे निधन झाले. पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या एका मुलीशी विवाह ठरला पण पुन्हा तोच प्रकार घडला. ते शेगावला दर्शनासाठी आले. त्यावेळी महाराजांनी त्यांना म्हटले, "अरे ! ब्रह्मचारी साहेबा, तुझ्या नशिबात प्रपंच नाही." बस ! झाले ! सर्व शंकांचे निरसन झाले. पुढची सर्व यंत्रणा कळली. दत्तोपंतांनी महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून स्वतःला धन्य करून घेतले.
महाराजांनी अनुग्रह दिला. त्यांच्यात शक्ती संक्रमित झाली. पुढे महाराजांच्या आज्ञेनुसार नोकरीचा राजीनामा देऊन ते सद्गुरूंच्या सेवेत हजर झाले. तनामनाने महाराजांच्या सेवेत स्वाधीन झाले. त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्यसाधना, अध्यात्मिक ओढ आणि तेज पाहून त्यांना महाराजांनी काही दिवसातच काशीक्षेत्री अध्ययनासाठी पाठवले. तेथे श्रीकृपेने ते वेदविद्यानिपूण झाले. ध्यानसाधना, प्राणायाम यामध्ये त्यांनी निपुणता मिळवली. काशी विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान केली. तेथून परत येऊन ते पुन्हा सद्गुरूंच्या सेवेत हजर झाले. महाराजांच्या शिष्यांमध्ये इतके उच्चविद्याविभूषित, मोठ्या मुद्द्यावरील आणि तसेच विद्यावाचस्पती यासारख्या श्रेष्ठ उपाधीचे ते प्रथम आणि एकमेव शिष्य होत.
स्वामी दत्तात्रय केदार यांनी स्वतःला पूर्णपणे महाराजांच्या पायी समर्पित केले. ते शेगावी मठात राहून गुरुसेवा करत असत. महाराजांसोबत बाहेरगावीसुद्धा जात असत. महाराजांच्या आज्ञेने ते अमरावती, नागपूर आणि इतरत्र भागात फिरून महाराजांच्या कृपाप्रसादाची महती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत. ते अमरावती भागातसुद्धा बरेच वेळा जात. पुढे महाराजांची त्यांना आज्ञा झाली की, "काचुर्णा हे पुण्य स्थळ आहे. तेथे राहून भक्तीप्रसार करावा." त्यानुसार ते ४/३/१९०२ रोजी काचुर्णा येथे आले. त्या भागात त्यांनी अनेक लोकांना गजानन महाराजांचे भक्त बनविले. महाराजांच्या कृपाप्रसादाची ओळख अनेक भक्तांना त्यांनी करून दिली. ते भक्तांना सोबत घेऊन अनेकवेळा शेगावला दर्शनाला घेऊन येत असत. भक्तांना त्यांच्या कीर्तन, प्रवचनाचा लाभ होई.
काचुर्णा हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. काचुर्णा येथे मंदिर बांधण्याची महाराजांनी त्यांना आज्ञा दिली त्यानुसार बळीराम पाटील या भक्ताने गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरासाठी जागा दान केली आणि तेथे मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंदिर बांधकाम पूर्णत्वाला जात होते, त्यावेळी स्वामी आणि इतर काही मंडळी महाराजांना तेथे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी शेगावला आली. सर्वांनी महाराजांची मनोभावे पूजा केली. केलेल्या कार्याला महाराजांच्या चरणी अर्पण केले आणि समर्थांना काचुर्णा येथे येण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी सांगितले, "या आमच्या पायातील पादुका घेऊन जा. आम्ही नंतर येऊ." सद्गुरूंनी दिलेल्या पादुका स्वामींनी प्रेमपूर्वक घेतल्या आणि टाळ, मृदुंग, वीणा यांच्या जयघोषात पादुका डोक्यावर ठेवून शेगाववरून काचुर्णा येथे जाण्यासाठी सर्वजण पायी निघाले. बळीराम पाटील यांनी पादुका डोक्यावर ठेवून अनवाणी प्रवास केला. यावेळी अनेक गावांमधून प्रवास करताना तेथील गावकऱ्यांनी या भक्त मंडळींची भोजन व्यवस्था करून पादुकांचे पूजन केले. परतवाडा येथे धर्माधिकारी आणि हिवरखेड येथे लालजी तोटे यांनी पादुकांचे पूजन आणि स्वागताचा भव्य सोहळा केला. ते पादुकांसोबत सहकुटुंब काचुर्णा येथे आले. त्यावेळी काचुर्णा येथे आजूबाजूच्या गावातून हजारो लोक या पादुकांच्या दर्शनासाठी जमले. संपूर्ण गाव सुशोभित करून करण्यात आले. प्रत्येक घरासमोर सडे घालून रांगोळ्या काढण्यात आल्या. गावातून पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर ओवाळून पादुकांची पूजा करण्यात आली. या प्रसंगी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दररोज किर्तन आणि प्रवचने झाली. शेवटच्या दिवशी मंदिरातील मूर्ती, पादुकांचा दूध, दही आणि गंगाजलाने अभिषेक करण्यात आला.
पादुका स्थापनेच्या दिवशी नेमक्या मुहूर्तावरच मंदिरात एक पंचा नेसलेली दैदिप्यमान अवलिया व्यक्ती प्रकट झाली. पादुकांना सिंहासनावर विराजित करण्यात आले. स्वामी दत्तात्रेय केदार त्या अवलिया विभूतीला नमन करून त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. ही अवलिया व्यक्ती दुसरी कोणी नसून समर्थ सद्गुरु गजानन महाराज होते. "आम्ही नंतर येऊ" या वचनाप्रमाणे ते तेथे प्रगट झाले. ही लीला सर्व गावकरी आणि भक्त यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. हे मंदिर महाराजांच्या हयातीतच बांधले गेले. तसेच पादुका आणि मूर्ती स्थापनेच्या दिवशी खुद्द सद्गुरु तेथे प्रगट होऊन पुढे गुप्त झाले. ही लीला गजानन महाराजांनी गुरुपुष्य योगावर केली.
स्वामी दत्तात्रय केदार हे गजानन महाराजांचे अंतरंगातले, संतत्व पदाला प्राप्त झालेले आणि उच्च आध्यात्मिक अधिकार असणारे शिष्य होते. गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतरसुद्धा ते शेगावला नियमित निरनिराळ्या कार्यक्रमांना हजर राहत असत. शेगाव संस्थानच्या निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवल्या जात असत. शेवटच्या काळात स्वामी समाधी लावून तीन दिवस, सात दिवस तर कधी कधी दहा-अकरा दिवस काचुर्णा मंदिरात बसत असत. त्यावेळी बळीराम पाटील, हरिभाऊ कडू, नाना वितुंडे असे भक्त रात्रंदिवस आळीपाळीने जागे राहून पहारा देत असत. स्वामींनी योगसाधनेत अतिशय उच्चतम स्थिती प्राप्त केली होती.
१७/१०/१९४३ रोजी स्वामी समाधिस्त झाले. वैद्य महादेव धर्माधिकारी यांचे नातू अजय धर्माधिकारी यांनी अमरावती जिल्ह्यातील सावळापुर (तालुका - अचलपूर) येथील स्वामींच्या समाधीचे महत्त्व आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मेहनत घेतली.
स्वामी दत्तात्रेय केदार आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.