मुंबई (जगदीश का. काशिकर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे नौदलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना यापुढे नौदलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गणवेशावर इंग्रज कालीन बोधचिन्ह राहणार नाही आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात लागू केलेली शिवमुद्रा असेल अशी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे नौदलातील अधिकारी आणि तत्सम कर्मचाऱ्यांनाही इंग्रजांनी लागू केलेली पदनामे दिली जात होती ती बदलून आता भारतीय पदनाने दिली जातील अशी ही घोषणा त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या या दोन्ही घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहेत, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या या देशातील लाखो करोडो शिवप्रेमींचा अभिमानाने भरून आणणाऱ्या देखील आहेत हे निश्चित. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर केंद्र सरकारच्या स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना जो सन्मान मिळायला हवा होता, तो आजवर कधीच मिळाला नव्हता. महाराष्ट्रापुरते महाराष्ट्र शासनाने शिवाजींना द्यायचा तो सन्मान निश्चित दिला. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जे प्रथम पंतप्रधान झाले त्यांनी लिहिलेल्या एका ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ठक किंवा पेंढारी अशा आशयाचा करण्यात आला होता अशी माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे निर्माते होते हे तत्कालीन पंतप्रधानांनी कधी मानले नसावे अशीच परिस्थिती होती.
त्यामुळेच केंद्र सरकारच्या स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित सन्मान कधीच मिळाला नव्हता. तो सन्मान देण्याची सिद्धता पंतप्रधानांनी केली ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.
भारताचा इतिहास बघितल्यास प्राचीन काळापासून लष्करात नौदल हा प्रकार कधी नव्हताच. त्या काळात युद्ध व्हायची ती जमिनीवर. मग युद्धासाठी सैनिक आणि सेनापती घोडे आणि हत्ती यांचाच वापर करायचै. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या क्षेत्रात आपले साम्राज्य उभे केले त्या क्षेत्रात सामुद्री किनारा असलेला भागही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे प्रथमच छत्रपतींनी आपल्या सैन्यात नौदल उभारण्याचाही निर्णय घेतला. कान्होजी आग्रेंसारखे निष्ठावंत सेवक त्यांनी नौदलाचे प्रमुख म्हणून नेमले. त्या काळात समुद्राकाठी दुर्ग उभारण्याची संकल्पना ही देखील महाराजांचीच होती. त्यामुळे भारतीय नौदल संकल्पनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात. नंतर देशात इंग्रजांचे सरकार आल्यावर त्यांनी लष्कराचे नौदल वायुदल आणि पायदल असे तीन भाग केले आणि त्यायोगे त्यांनी आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन राज्यकर्त्यांनी इंग्रजांनी ज्या पद्धती आणि परंपरा रूढ केल्या होत्या त्याच पुढे जशाच्या तशा चालू ठेवल्या. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पडल्यानंतर का होईना पण या परंपरा आणि पद्धती बदलल्या जात आहेत याचे निश्चितच स्वागत व्हायला हवे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशाच्या पंतप्रधानांनी सिंधुदुर्ग येथे येऊन आदरांजली अर्पण करावी आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करावे ही बाबही प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारीच आहे.
आधी नमूद केल्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लष्करात सर्व इंग्रजी प्रथा परंपरा सुरू होत्या. त्यात कोणताही बदल झाला नव्हता. इतकेच काय पण इंग्रजांनीच दिलेली पदनामे सुद्धा कायम ठेवण्यात आली होती. त्याला भारतीय चेहरा मोहरा देण्याचा कधीच प्रयत्न झाला नव्हता. २०१४मध्ये देशात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यानंतर नंतर देशात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही बदल केले त्यामुळे भारतीयीकरण होऊ लागले आहे. आता मोदींनी घोषणा केल्यानुसार हे भारतीयीकरण अधिक वेगाने होणार अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.
आपल्या लष्करात लागणारी शस्त्रसामुग्री ही देखील गेली अनेक वर्ष परकीय बनावटीची वापरली जात होती. नाही म्हणायला देशात काही शस्त्रांचे कारखाने झाले होते. मात्र परदेशातून शस्त्र खरेदी करण्यावर देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत होते. २०१४ नंतर त्या प्रकारालाही हळूहळू रोख लावत स्वदेशीकरणावर भर दिला जातो आहे. त्यामुळेच देशात भारतीय बनावटीची लढाऊ विमाने आणि लढाऊ नौका यादेखील बनवल्या जाऊ लागल्याआहेत.
लष्कराचे जवान जेव्हा युद्धासाठी निघतात किंवा शांततेच्या काळातही पथसंचलन करतात तेव्हा ते संचलन गीत वाजवत जात असतात. त्याला मार्शल ट्यून असे म्हटले जाते. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष इंग्रजांनी बनवलेल्या मार्शल ट्यूनच लष्करात वाजवल्या जात होत्या. त्यात बदल २०१८ साली झाला.
लष्कराच्या महार रेजिमेंट चे रेजीमेंट गीत स्वरबद्ध करताना ते संपूर्ण भारतीय सुरावटीत आणि भारतीय वाद्य वापरून भारतीय रागदारीच्या मदतीने संगीतबद्ध केले गेले. हे काम नागपुरातील संगीताच्या प्राध्यापिका डॉ.तनुजा नाफडे यांनी केले होते. हेच गीत तत्कालीन लष्कर प्रमुख विपिन रावत यांना आवडले आणि या गीताची धून ही लष्कराची मार्शल ठेवून म्हणून मान्य करण्यात आली. ही मार्शल ट्यून भारतीय रागदारीच्या आधारे लष्करी वाद्यांवर वाजवून संगीतबद्ध करण्यात आली आहे हे विशेष. लष्कराने ही मार्शल ट्यून मंजूर करून २०१७ मध्ये लागू केल्यावर नंतर वर्षभरातच प्रादेशिक सेनेनेही याच धर्तीवर आपले सेना गीत संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीताच्या मदतीने संगीतबद्ध करून घेतले. मात्र लष्कराच्या इतर रेजिमेंट्स मध्ये अजूनही इंग्रजांनी दिलेल्या मार्शल ट्यूनच वाजवल्या जातात. हा प्रकार देखील आता बदलायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत गरीब भारतीय परिवारातून लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांचे शिक्षणही पूर्णतः भारतातच झाले आहे. केंब्रिज किंवा ऑक्सफर्ड अशा विद्यापीठात जाऊन त्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही.शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून ते घडलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण स्वदेशी मानसिकतेतून त्यांची जडणघडण झाली आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणूनच त्यांनी छत्रपतींचा सन्मान करताना सोबत लष्करात भारतीय पदनामे लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असे म्हणता येते.
भारताचा इतिहास बघितल्यास भारतीयांचा लढाऊ वाणा कधीच नाकारता येत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य असो किंवा महाराणा प्रताप यांचे, या सैन्यातील प्रत्येक सैनिकाने आपल्या मातृभूमी प्रति एकनिष्ठ राहत युद्ध केलेले आहे.
आजही तीच परंपरा कायम आहे. अशावेळी भारतीय लष्करातील भारतीय जवानांना जर पूर्णतः स्वदेशी वातावरण मिळाले तर ते अधिक जोषाने देशाच्या रक्षणासाठी कटिबद्ध होतील यात शंका नाही. त्याच दृष्टीने पंतप्रधानांनी हे आणखी एक पुढचे पाऊल उचलले. त्याबद्दल सर्व देशवासीयांनी त्यांचे अभिनंदनच करायला हवे.