मुंबई (जगदीश काशिकर) : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात नुकतीच एक गुप्त वैचारिक बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रात येत्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हावरच लढवाव्या आणि मित्रपक्षांना देखील भाजपमध्ये येऊन कमळ या चिन्हावरच लढायला सांगावे असा निर्णय घेण्यात आला असल्याचा गौप्यस्फोट शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्थात या मुद्द्यावर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर येत खुलासा केला आहे आणि अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सूत्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार देखील अशी कोणतीही बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश, यांच्यात झाली नसून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे लक्षात घेता जितेंद्र आव्हाड यांनी जे काही जाहीर केले ती शुद्ध फोकनाड आहे असे म्हणता येते. आपल्या विरोधकांना गाफील ठेवून गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी दिलेली ही एक शुद्ध लोणकढी थाप आहे हे नक्की. नागपुरी पत्रकारांच्या भाषेत अशाप्रकारे थापा मारणे म्हणजे पतंग उडवणे असे म्हटले जाते. अशीच पतंग इथे जितेंद्र आव्हाड यांनी उडवली आहे असा निष्कर्ष इथे काढता येतो.
या प्रकरणात काही खुलासा करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पदाधिकारी किंवा प्रवक्ता नाही हे आधीच स्पष्ट करायला हवे. मात्र संघाशी संबंध आलेला संघाचा एक अभ्यासक पत्रकार म्हणून मी संघासंबंधात जमेल तेव्हा जमेल तसे भाष्य करीत असतो. त्यामुळे माझ्या अल्पमतीनुसार मी आव्हाडांच्या या गौप्यस्फोटावर जे काही जमेल तसे भाष्य करणार आहे.
संघ आणि भाजप यांच्यात अशी गुप्त बैठक झाल्याची आव्हाडांनी माहिती देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ध्येयधोरणे, कार्यपद्धती कशी आहे आणि संघ तसेच संघाशी संलग्नित संस्था यांच्यात संबंध कसे असतात याची माहिती करून घेतली असती तर बरे झाले असते. तसे केले असते तर त्यांनी असे थेट फोकनाड विधान करण्याची हिम्मत केलीही नसती. मात्र संघ व्यवस्थेची माहिती करून घेण्यासाठी आव्हाड माझ्या माहितीप्रमाणे तरी कधीच संघाच्या संबंधात आलेले नाहीत. आणि जोवर माणूस संघात जाऊन अनुभव घेत नाही तोवर त्याला संघ नीटसा कधीच समजत नाही असे म्हटले जाते.
इथे संघशाखेत शिकवल्या जाणाऱ्या संघगिताच्या दोन ओळी आठवतात. त्या सांगण्याचा मोह मला आवरत नाही. त्या ओळी अशा आहेत...
सांगता तुम्ही संघ मोठा...
संघात हाय काय...
संघात गेल्याबिगर ...
उमजायचं नाय नाय....
या ओळी लक्षात घेता आव्हाडांना संघ काहीही समजलेला नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे विरोधकांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी ही वावडी उठवली आहे हे स्पष्ट होते. संघाच्या एकूण कार्यपद्धतीचा मी जो काही अभ्यास केला आहे तो लक्षात घेता संघ हा त्यांच्या संलग्नित संस्थांच्या कधीच दैनंदिन भानगडीत पडत नाही. संघ आखून देत असलेल्या धोरणांनुसार आपल्या सोयीने आपण काम करावे आणि संघाने दिलेले लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करावा असेच संघाचे म्हणणे असते.
१९२५सालच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी एकच ध्येय ठेवले होते. भारताला जागतिक महासत्ता म्हणजेच विश्वगुरू बनवण्यासाठी माणसांची जडणघडण करायची आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात काम करायला मोकळीक द्यायची, हे तत्व डोळ्यासमोर ठेवूनच हेडगेवार यांनी कामाला सुरुवात केली होती. सुरुवातीला संघशाखेत येणे आणि वैचारिक आदान प्रदान करणे इतकेच त्यांचे कार्य होते. मात्र त्यायोगे माणूस घडवणे सुरू झाले होते. स्वातंत्र्यलढ्यात संघ कुठे होता असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र संघाने घडवलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते हे वास्तव कधीच नाकारता येत नाही. असे असले तरी संघ विरोधक नेहमी अर्धा भाग बघतात आणि त्यावरून संघावर टीका करत असतात. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला. त्यावेळी त्याला पाठिंबा म्हणून देशभर विविध प्रकारे सत्याग्रह करायचा असा निर्णय झाला होता. त्याला प्रतिसाद देत डॉ. हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला होता आणि त्यात त्यांना तुरुंगवासही झाला होता. याचे दाखले आजही उपलब्ध आहेत. डॉ. हेडगेवार यांचे १९४० साली निधन झाले.
त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातही संघ स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची फाळणीही झाली. त्यावेळी अनेक कटू घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये जनसामान्यांची विशेषतः पीडित हिंदू समाजाची सेवा करण्यात संघ स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आघाडीवर होते. या काळात संघाचे नेतृत्व माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गुरुजी यांचे कडे होते. १९४८ मध्ये संघावर बंदी आली. त्यावेळी संघ स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून संघाला सरकारला बंदी उठवण्यास भाग पाडले. त्यानंतर समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संघाने सक्रिय व्हावे असा विचार झाला. आणि त्यानुसार कामाला सुरुवात झाली. त्यातूनच राजाकारणात संघ स्वयंसेवकांनी सक्रिय होण्यासाठी भारतीय जनसंघाची स्थापना झाली. विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर मजूर क्षेत्रात भारतीय मजदूर संघ हेही स्थापन केले गेले. असेच वनवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम ,कृषी क्षेत्रात भारतीय किसान संघ या संघटनाही पुढे आल्या. आज संघाच्या भारतीय जनजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जवळजवळ ३६ प्रमुख संघटना आहेत तर संघ विचारांवर चालणाऱ्या मंडळींच्या शंभरहून अधिक संघटना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.
या संघटना संघाने स्थापन केल्या आहेत का याचे उत्तर नाही असेच मिळते. मात्र संघ विचाराच्या किंवा संघाने घडविलेल्या स्वयंसेवकांच्या डोक्यात आलेल्या विचारांच्या आधारावर या संघटनांची जडण घडण झाली आहे अशा संघटना उभारण्यास संघाने उत्तेजन जरूर दिले, मात्र त्यात हस्तक्षेप कधीही केलेला नाही. संघाच्या ध्येयधोरणांनुसार या संघटनांनी देशहित आणि हिंदू हित लक्षात घेऊन कार्यरत व्हावे आणि आपले लक्ष्य गाठावे इतकीच संघाची अपेक्षा असते.
संघ आणि हिंदुत्व यांचा कायम संबंध जोडला जातो. होय... संघाने हिंदुत्व स्वीकारले आहे. मात्र त्यांच्या मते हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे. या भारतभूमीत राहणारा इथे जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला प्रत्येक माणूस हा संघाच्या मते हिंदू आहे. त्याच पद्धतीने संघ आपले काम करतो आहे.
वर सांगितल्याप्रमाणे संघाच्या कार्यकर्त्यांच्या विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या आज शंभरहून अधिक संघटना देशभरात कार्यरत आहेत. या संघटनांना दिशादर्शन संघ जरूर करत असेल. मात्र त्यांच्या दैनंदिन कारभारात संघ कधीही हस्तक्षेप करत नाही. आम्ही तुम्हाला जे लक्ष्य दिले आहे ते गाठण्यासाठी तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला मदत लागेल तिथे आम्ही आहोत. मात्र तुमचे निर्णय तुम्ही घ्या. आम्ही त्यात ढवळाढवळ करणार नाही असेच संघ कायम सांगत आलेला आहे. आज संघ स्वयंसेवक सत्तेत आले आहेत. जर एखाद्या सत्ताधारी नेत्यांकडून एखादे काम करवून घेण्यासाठी जर एखाद्या संघ स्वयंसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शब्द टाकला तर संघ या बाबतीत कधीच बोलत नाही असे उत्तर शांतपणे दिले जाते.
आधी नमूद केल्याप्रमाणे संघाने माणसं घडवली आणि त्यांना विविध क्षेत्रात कार्यरत केले. मग विद्यार्थी क्षेत्रात संघटन उभे करायला दत्ताजी डिडोळकर पुढे आले. तर कामगार क्षेत्रात संघटनेची बांधणी करायला दत्तोपंत ठेंगडी जबाबदारी पेलते झाले. वनवासी क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी बाळासाहेब देशपांडे यांच्यासारखा वकील पुढे आला. दिनदयाळ शोध संस्थान उभारण्यासाठी नानाजी देशमुखांनी कंबर कसली.राजकीय क्षेत्रात संघटन उभारण्यास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय, लाल कृष्ण जी अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी असे अनेक दिग्गज उभे झाले.आधी भारतीय जनसंघ म्हणून सक्रिय झालेला जनसंघ नंतर जनता पक्षात विलीन झाला. अवघ्या तीन वर्षात जुन्या जनसंघी मंडळींनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला.या पक्षाने अगदी दोन पासून तीनशे तीन पर्यंत वाटचाल केली. पुढे अशीच वाटचाल सुरू आहे. आज देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघेही संघ विचारांचे पाईक आहेत. देशातील जवळजवळ अर्ध्या राज्यांमध्ये संघ विचारांचे मुख्यमंत्री सत्ता सांभाळत आहेत. समाजाच्या जवळ जवळ सर्व क्षेत्रांमध्ये संघ सक्रिय आहे. आज संघाचे दैनंदिन स्वयंसेवक फारसे दिसत नसतीलही, मात्र संघाशी संलग्नित विविध संघटनांमार्फत देशातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत संघ पोहोचला असून हे सर्व संघ समर्थक आहेत हे निश्चित झाले आहे.
आधी सांगितल्यानुसार संघ कार्यकर्ते तयार करून विविध संघटनांमध्ये देतो आणि हे कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार संघटनेची जडणघडण करतात. या जडणघडणीत संघ कधीही हस्तक्षेप करत नाही. काही नजीकच्या काळातली उदाहरणे द्यायची तर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत भांडणांमध्ये संघाने कधीच ढवळाढवळ केली नाही. १९९५ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील संघाशी संबंधित असलेल्या परिवारातील चैनसुख संचेती यांनी भारतीय जनता पक्षाची कथीत शिस्त मोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
त्यात चैनसुख संचेती आणि त्यांच्या अनेक साथीदारांना भारतीय जनता पक्षाने निष्कासित केले. मात्र संघाचे आणि या निष्कासित मंडळींचे संबंध तेच होते. भारतीय जनता पक्षाने सहा वर्षासाठी निलंबित केलेला चैनसुख संचेती संघाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून बोलावला जात होता. या प्रकारात संघाने दोन्ही बाजूंना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र संघाचे निर्णय कोणावरही लादले नाहीत.
जो प्रकार चैनसुख संचेती यांच्या बाबत झाला, तोच प्रकार बनवारीलाल पुरोहित आणि प्रमोद महाजन यांच्या वादातही झाला होता. त्यातही संघाने दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र कोणत्याही बाजूवर आपला निर्णय लादला नव्हता. असे अनेक दाखले देता येतील. १९९५ मध्ये गुजरात मध्ये वाघेलांनी जे बंड केले त्यातही संघाने समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका विशिष्ट टप्प्यानंतर संघ या वादातून बाजूला झाला होता.
आपल्या ९८ वर्षाच्या वाटचालीत संघाने आपली गैरराजकीय सामाजिक संघटन ही ओळख कायम जपली आहे. समाजाच्या राजकीय किंवा इतर तत्सम क्षेत्रांमध्ये कुठेही थेट ढवळाढवळ त्यांनी केलेली नाही. कोणत्याही निवडणुकीत संघाने खुलेआम भाजपला पाठिंबा देत प्रचारात उतरला नव्हता. त्याचप्रमाणे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री कोणाला करावे याबाबत संघ कधीच हस्तक्षेप करत नाही.त्यामुळेच संघ आज शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. आणि या शंभर वर्षाच्या वाटचालीत संघ कायम वाढलेलाच दिसतो हे वास्तव नाकारता येत नाही. संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. त्यावेळी त्या दरम्यान या देशात विविध विचारधारा पुढे आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने काँग्रेस, हिंदू महासभा, समाजवाद, डावी विचारसरणी या प्रमुख विचारधारा होत्या. त्यातील आज डावी विचारसरणी देशात एका राज्यापूर्ती शिल्लक राहिली आहे. समाजवाद तर कुठेच नाही. हिंदू महासभा, त्याचे कुठे अस्तित्वही नाही. कॉंग्रेस आज कशा अवस्थेत आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कायम वाढतोच आहे, आणि १९२५ साली संघ मैदानावर खेळणाऱ्या तरुणांचा एक गट इतकी माफक ओळख असणारा हा संघ एका विशाल भटवृक्षासारखा समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचलेला दिसतो आहे.
संघ त्यांच्या संलग्नित संघटनांची संबंध जपताना जर ढवळाढवळ करत नसेल तर संघ नेमके काय करतो हा प्रश्न वाचकांना निश्चित पडू शकतो. संघाची कार्यपद्धती लक्षात घेतली तर संघाचे सरसंघचालक आणि सहकार्यवाह यांच्या नेतृत्वात संघाची एक राष्ट्रीय कार्यकारणी कार्यरत असते. त्या खालोखाल संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा कार्यरत असते. त्यानंतर संघाचे प्रत्येक प्रांतात प्रांत प्रचारक, प्रांत कार्यवाह असे पदाधिकारी असतात. त्या खालोखाल महानगर, भाग, विभाग आणि शेवटी शाखा असे प्रत्येक टप्प्यावर त्यांचे अधिकारी कार्यरत असतात. संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी वर्षातून दोनदा किंवा तीनदा भेटते. त्यात वर्षभराची ध्येय धोरणे ठरवली जातात. झालेल्या कामाचा आढावाही घेतला जातो. या बैठकीमध्ये संघाशी संलग्नित संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असतात. प्रतिनिधी सभेतही हाच प्रकार असतो. प्रतिनिधी सभा देखील वर्षातून दोनदा भेटत असते. या बैठकीत वर्षभराचे कार्यक्रम ठरतात. आणि ध्येय धोरणे आखून दिली जातात. त्या ध्येयधोरणांनुसार संघ आणि संघाच्या प्रत्येक संघटनेने काम करायचे असते. त्यांनी दैनंदिन स्तरावर काय करावे यात संघ कधीच लक्ष घालत नाही. संघाने दिलेल्या चौकटीबाहेर जरी एखादी संघटना जात असेल तरी संघ त्यात हस्तक्षेप करत नाही. संघाशी पूर्णतः वैचारिक मतभेद असलेल्या अजित पवार गटाशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने युती केली. संघाचा त्यात काहीही आक्षेप नाही. सामान्य स्वयंसेवकांनी भलेही नाराजी व्यक्त केली असेल. मात्र संघाच्या अधिकाऱ्यांनी या स्वयंसेवकांना शांतपणे समजावण्याचेच काम केले आहे. त्यामुळे अशा निर्णयाविरोधात संघ परिवारात कुठेही नाराजी दिसली नाही. भारतीय जनता पक्षापूरते बोलायचे झाल्यास संघाने त्यांना लक्ष्य ठरवून दिले आहे. हिंदुत्वाची जपणूक करत या देशाला जागतिक महासत्ता म्हणजेच विश्वगुरू बनवायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाजपने काम करायचे आहे. त्यासाठी भाजपाने कोणाशी युती करावी, ती युती करताना कोणाला कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगायचे अशा चिल्लर गोष्टीत संघ कधीच लक्ष घालत नाही. आज संघाला अपेक्षित असलेल्या घटना २०१४ पासून घडताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये असलेले कलम ३७० हटवले गेले आहे. राम मंदिराची उभारणी होऊन आता त्याचे लोकार्पणही होते आहे. जुलमी कायदेही हळूहळू रद्द केले जात आहेत. लवकरच समान नागरी कायदा देखील लागू होईल असे चिन्ह दिसते आहे. संघ यातच समाधानी आहे. बाकी भाजपाने कोणाशी युती करावी, भारतीय मजदूर संघाने कोणाविरुद्ध संघर्ष करावा अशा भानगडीत संघ कधीही लक्ष घालत नाही.
मला आठवते संघाशी संबंधित एका उद्योगपतीविरुद्ध भारतीय मजदूर संघाने आंदोलन उभारले होते. त्यावेळी मीच मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांना विचारले होते की हा तुमचाच माणूस आहे ,मग त्याच्याविरुद्ध आंदोलन का करता? तेव्हा मला कामगारांचे हित महत्त्वाचे आहे ते मी जपतो आहे आणि त्यासाठी कोणत्याही टोकाला मी जाऊ शकतो असे उत्तर दत्तोपंतांनी दिले होते. माझ्या आठवणीनुसार त्या उद्योगपतीविरुद्ध त्यांनी संघर्षही केला होता.
ज्याप्रमाणे संघाच्या प्रतिनिधी सभा आणि कार्यकारिणीच्या बैठकी होतात त्याचप्रमाणे संलग्नित संस्थांसोबत संघाच्या अधिकाऱ्यांच्याही वर्षातून दोनदा किंवा तीनदा समन्वय बैठकी होत असतात. या बैठकीत प्रत्येक संघटनांनी काय काम केले त्याचा आढावा घेतला जातो आणि गरज असेल तिथे मार्गदर्शन जरूर केले जाते. मात्र कोणताही आग्रह धरला जात नाही. या संघटनांकडून त्यांच्या अडचणी सांगितल्या जातात आणि त्यात इतर संघटनांशी समन्वय करायची गरज असली तर तिथे संघ जरूर सहकार्य करत असतो.
अधी नमूद केल्याप्रमाणे संघ कार्यकर्ते घडवतो आणि त्यांना समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या सोयीनुसार काम करू देतो. त्यांच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही. यामुळेच देशाचे केंद्रीय मंत्री असलेले नितीन जयराम गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे संघाच्या गणवेशात विजयादशमीच्या उत्सवात जरूर दिसतात. मात्र सरकारमध्ये काम करताना त्यांनी काय करावे यासाठी संघ अधिकारी कधीही सूचना देत नाहीत. दबाव टाकण्याचा तर प्रश्नच येत नाही.
२०१४ पासून देशात भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे. यापूर्वी देखील दोन १९९८ ते २००४ या काळात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार होते. या दोन्ही काळात देशाचे पंतप्रधान संघ स्वयंसेवकच होते. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर वाजपेयी सरकारचा रिमोट कंट्रोल हा नागपूरच्या संघ मुख्यालयात ठेवलेला आहे असा जोरदार आरोप सुरू झाला होता. अर्थात त्यात तथ्य काहीही नव्हते. मला आठवते त्यावेळी एका संपादकाच्या सूचनेवरून मी या प्रकरणाचा मागोवा घेत वाजपेयी सरकारचा रिमोट कंट्रोल नागपूरच्या संघ मुख्यालयात आहे काय? या शीर्षकाचा एक लेखही लिहिला होता. हा लेख मुंबईच्या दैनिक नवशक्तीने प्रकाशित केला होता. तो त्यावेळी बऱ्यापैकी गाजला होता. हा लेख नंतर माझ्या दाहक वास्तव या लेखसंग्रहात समाविष्ट करण्यात आला आहे. वाचकांसाठी हे पुस्तक उपलब्ध होऊ शकते. त्यातही एकूण संघाची व्यवस्था कशी आहे आणि संघ आपल्या सहयोगी संस्थांवर किती अंकुश ठेवतो किती नाही याचा उहापोह करण्यात आला आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकत्र बैठक होऊन त्यांनी मित्र पक्षांनाही कमळाच्या चिन्हावर लढायला लावावे अशा सूचना दिल्या असण्याची सुतरामही शक्यता नाही हे स्पष्ट होते. तरीही जितेंद्र आव्हाडांनी ही वावडी उठवली आहे. त्यामागे त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. त्यांच्याजवळ या संदर्भात कोणताही पुरावा असावा असे वाटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर गेलेला अजितदादा पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर गेलेला एकनाथ शिंदे गट यातील सदस्यांना गोंधळात टाकायचे आहे. त्यासाठीच त्यांनी ही वावडी उठवली आहे हे स्पष्ट होते.
मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नजरेसमोर ठेवून अशी कोणतीही वावडी उठवताना आधी संघ समजून घ्यायला हवा होता हे आव्हाडांनी लक्षात घ्यायला हवे होते. त्यांनी संघ कधी समजूनच घेतला नाही, तसा प्रयत्नही केला नाही. त्यामुळेच अशी वावडी उठवण्याची त्यांची हिंमत झाली. अर्थात पाण्यावरचे बुडबुडे काही क्षणात विरून जावे तशी या वावडीची अवस्था होणार आहे हे नक्की. भारतीय जनता पक्षाने कोणाशी युती करावी आणि कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी यात संघ परिवाराला काहीही देणे घेणे नाही. म्हणूनच संघाने या संदर्भात कोणताही खुलासा केला नाही. हा मुद्दा देखील लक्षात घ्यायला हवा.भाजपने संघाने आखून दिलेल्या चौकटीत संघाची ध्येयधोरणे राबवत संघाने दिलेले लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करावा इतकीच संघाची अपेक्षा आहे.
नेमका हाच मुद्दा लक्षात घेत जितेंद्र आव्हाड किंवा त्यांच्यासारखे बोलबच्चन संघ विरोधक यांनी भविष्यात अशा प्रकारच्या वावड्या कशा उठवाव्या यांचा विचार करावा इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो...!
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!