मुंबई (जगदीश काशिक) : मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी आरक्षित असणाऱ्या घरांच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. हा काळा बाजार करणाऱ्या काही टोळ्या आहेत. या टोळ्यांतील लुटारूंनी 'गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या सोसायटीमध्ये घरे देतो', असे सांगून असंख्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यातून या टोळीने कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (SIT) हाती आलेली आहे.
मुंबईच्या जडघडणीत गिरणी कामगारांचा मोलाचा वाटा आहे, ही जाणीव ठेवून त्यांना हक्काची घरे मिळणे आवश्यक होते. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलली व हा प्रलंबित प्रश्न सोडवला. मात्र काही दलालांच्या टोळ्या म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या घरांचा चक्क काळा बाजार करीत p. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस स्थानकात किंवा म्हाडाकडे तक्रार करायची हिंमत दाखवल्यास त्यांना म्हाडातील अधिकारी व पोलीस यांच्याकडून कधीही सहकार्य मिळत नसे. यापैकी बहुतेक टोळ्यांना राजकीय किंवा पोलिसांचाच वरदहस्त आहे, हे स्पष्ट दिसून येते. मात्र लालबाग येथील चक्क एका पोलीस हवालदारालाच एका टोळीने फसवले. त्यामुळे पोलिसांची चक्रे फिरली व त्यांनी या एका रॅकेटचा पर्दाफाश केला.
परळ, लालबाग, वरळी, नायगाव, भायखळा येथे आजही मोठ्या संख्येने पूर्वीचे गिरणी कामगार व त्यांचे कुटुंबीय राहतात. गिरण्या बंद पडल्यांनंतर यापैकी काही रहिवाशी कोकणात किंवा इतरत्र स्थायिक झाले. मात्र या गिरणी कामगारांनी त्यांना मुंबईत हक्काचे घर मिळावे, म्हणून मोठा लढा दिला. अखेर सरकारनेही त्यांच्यासाठी घरांची योजना आखली व म्हाडाच्या सहकार्याने त्याची पूर्तता केली.
या पूर्ततेनंतर घरे मिळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र त्यात काही अडचणी येऊ लागल्या. काही गिरणी कामगारांकडे कागदपत्रे अपूर्ण असतात, तर काहींना घरे घेण्यासाठी लागणारी शुल्लक रक्कम भरण्यासाठी पैसे नसतात, कित्येक वेळेला हे सर्व असते पण स्वतः गिरणी कामगारच अज्ञानी असतो. या सर्व परिस्थितीचा फायदा या दलालांच्या टोळ्या घेत आहेत.
आतापर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे केले आहेत. या सर्व अर्जदारांची लिस्ट म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून दलालांच्या टोळ्यांकडे जाते. या अपडेटेड लिस्टनुसार या टोळ्या अर्जदारांना संपर्क करतात. वेळप्रसंगी त्यांना त्यांच्या कोकणातील किंवा अन्य गावी जावून गाठतात. त्यांच्याशी गोडगोड बोलतात. वेळप्रसंगी त्यांना १ ते २ लाख रुपये देतात आणि त्यांच्याकडून जुजबी कागदपत्रांवर सह्या घेतात. काही महत्वाची कागदपत्रेही या कामगार अर्जदाराकडून किंवा म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळवली जातात आणि याच कागदपत्रांच्या आधारे 'पॉवर ऑफ ऍटर्नी' (मुखत्यारपत्र) तयार केली जाते.
याच मुखत्यारपत्राच्या आधारे भायखळा पोलिसांनी पकडलेले आरोपी नागरिकांची फसवणूक करीत होते. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी लालबाग येथील रहिवासी संजय नारायण कदम, लालबाग व सातरस्ता येथील धोबीघाट (जे. आर. बोरीचा मार्ग ) येथे रहाणारा गणेश राजाराम आडिवरेकर तर वडाळा येथील रुपेश रमेश सावंत यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेची ४२०, ४०६, ४६७, ४६८ व ३४ ही कलमेही लावलेली आहेत.
या प्रकरणात घोडपदेव येथे राहणाऱ्या ज्ञानेश दत्ता मांडवकर व रुपेश रमेश सावंत या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. तर गणेश राजाराम आडिवरेकर व संजय नारायण कदम हे आरोपी फरार आहेत, त्यांच्यावर यापूर्वीही असंख्य गुन्हे असण्याची शक्यता आहे, याशिवाय या केसमध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यताही पोलीस सहायक निरीक्षक (एपीआय) गिरीश तोगरवाड यांनी 'स्प्राऊट्स'शी बोलताना व्यक्त केली.
अशी केली फसवणूक?
मुंबईतील परळ, लालबाग, वरळी, भायखळा येथील घरांना सोन्याहून अधिक भाव आलेले आहेत. एका घरासाठी अक्षरश: कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. याचा फायदा या दलालांच्या टोळ्या घेत आहेत. या टोळीने संतोष प्रभाकर भोसले यांना लालबाग येथील गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये घर देतो, असे अमिश दाखवले व त्यांच्याकडून १८ लाख रुपये उकळले.
भोसले यांच्यासारख्या अनेक जणांना या टोळीने घरे देतो, असे सांगून लाखो रुपये घेतले. प्रत्येकाला घराची 'पॉवर ऑफ ऍटर्नी' दाखवायची व त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचे. इतकेच नव्हे तर एकाच घरासाठी त्या घराची पॉवर ऑफ ऍटर्नी दाखवून ही टोळी असंख्य नागरिकांडून पैसे घेत होती.
या टोळीतील फरार असणारा गणेश राजाराम आडिवरेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक पदाधिकारी आहे. अगदी शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, समीर भुजबळ यांच्याबरोबर त्याचे संबंध आहेत, हे दाखवण्यासाठी या आरोपीने त्यांच्याबरोबर फोटो काढलेले आहेत व ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले. काही वेळेला पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देतांनाही त्याने फोटो काढले व तेही सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले आहेत. या फोटोंचा दुरुपयोग केला जात होता. त्यामुळे कोणी या टोळीविरोधात ब्र काढण्याची हिंमत करीत नव्हते.
संतोष भोसले मात्र पोलीस हवालदार आहेत, त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याची हिंमत दाखवली व भायखळा पोलिसांनीही काही आरोपीना त्वरित अटकही केली, तर काहींचा तपास चालू आहे. यातील काही आरोपींवर याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या केसमध्ये आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे व तसे झाल्यास अनेक राजकीय वरदहस्त असणाऱ्या व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. या टोळीतील आरोपींनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केलेली आहे. या काळ्या संपत्तीचाही तपास करण्याची मागणी काही नागरिकांनी 'स्प्राऊट्स'कडे नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे.