‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान.!

सनातन धर्माच्या विरोधात 'हेट स्पीच' करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.!

मुंबई (जगदीश काशिकर) : सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. अर्बन नक्षलवादी हे जसे देशाच्या विरोधात तसे सनातन धर्माच्याही विरोधात आहेत. उदयनिधी स्टॅलीन, ए. राजा, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री, निखिल वागळे यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आदी जर सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करत आहेत तर आम्हालाही सनातन धर्माचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करून ‘हेट स्पीच’ देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ या अभियानाच्या अंतर्गत दादर (पू.) पद्मशाली युवक संघ सभागृह येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध भागांतून व्याख्यानाला उपस्थित झालेल्या सनातन धर्मरक्षकांनी संघटितपणे कृती करण्याचा निर्धार केला. 'Jago Hindu Mumbai' या फेसबुक पेजवरुन या व्याख्यानाचे 'लाइव्ह प्रसारण' करण्यात आले, ज्याचा शेकडो धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, 'या देशात 'सर तन से जुदा'ची घोषणा करणाऱ्यांच्या विरोधात 'हेट स्पीच’चा गुन्हा दाखल होत नाही, मात्र सकल हिंदु समाजाच्या ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’त लव जिहाद विरोधी कायदा करावा ही मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात 'हेट स्पीच’च्या खटल्यात सर्वाेच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात बहुतांश गुन्हे दाखल केले गेले. सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण के यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ उघडपणे घेतली; म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्रात ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंद केला जातो आणि हे शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करणाऱ्या महाराष्ट्र सरकारकडून हे होत आहे. हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस ॲण्ड पीस’ या संघटनेचा हात आहे. मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड इत्यादींच्या विरोधात ‘हेटस्पीच’चा एकही गुन्हा दाखल केला नाही. यातूनच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते.
अर्बन नक्षलवाद्यांचे सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान समितीच्या वतीने देशभर राबवले असून यामध्ये विविध व्याख्याने, बैठका या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली, असे श्री. शिंदे यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.