बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर पूर्ण शेड बांधण्यात यावे. - गणेश सैदाणे
प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 च्या विविध समस्यांबाबतचे निवेदन स्टेशन मास्तरांना दिले .!
बल्लारपूर (का.प्र.) : चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे नागपूर विभागाचे डीआरयूसीसी सदस्य गणेश सैदाणे यांच्या नेतृत्वाखाली दि.02/01/2025 रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 आणि 5 संबंधी विविध समस्यांबाबतचे निवेदन स्टेशन मास्टर रवींद्र नंदनवार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत प्रवाशांना पाऊस आणि उष्णतेपासून वाचवण्यासाठी शेड बांधण्यात आले आहेत. मात्र दोन शेडमधील अंतर जास्त असल्याने पावसाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.तसेच फलाट क्रमांक 4 व 5 वर अस्वच्छता असून रेल्वे रुळावरही घाण पसरली आहे. त्यामुळे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बल्लारशाह रेल्वे स्टेशन मास्टर रवींद्र नंदनवार म्हणाले की, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 बाबतच्या विविध समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील.
निवेदन देताना डीआरयूसीसी सदस्य गणेश सैदाणे,चंद्रपूर जिल्हा प्रवासी संघटनेचे ज्ञानेंद्र आर्य,विकास राजुरकर, श्रीनिवास कंदकुरी सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.