युवराज छत्रपति संभाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा आंदोलनाचे नेते योगेश केदार यांचे मनोगत !!

मुंबई (जगदीश काशिकर) : राजकारणातला राजहंस आधुनिक युगातील श्रीराम. वाढदिवसानिमित्त आज छत्रपति संभाजी महाराजांना भेटून शुभेछ्या दिल्या. आशीर्वाद घेतले. आज बऱ्याच वर्षांनी नवीन राजवाड्यावर भेट झाली. काल रात्री आणि आज सकाळी निवांत गप्पा झाल्या. 
राजेंच्या बाबतीतले एक वेगळेपण महाराष्ट्राला सांगावे वाटते. पुराणकाळात वडिलांच्या इच्छेखातर प्रभू श्रीरामचंद्रंना राजकीय विजनवासात जावे लागले किंवा वनवास भोगावा लागला. वडिलांच्या विषयी असलेल्या अगाध प्रेमापोटी राम प्रभूंनी सर्व ऐश्वर्य सोडून रानावनात फिरण्याचा मार्ग स्वीकारला. कुटुंबासाठी त्याग कसा करायचा असतो याचा आदर्श पाठ जगाला घालून दिला. अगदी त्याच धर्तीवर या आधुनिक श्रीरामाला म्हणजेच संभाजीराजेंना केवळ वडील नाराज होतील या कारणास्तव राजकारणातील अनेक संधी गमवाव्या लागल्या. परिवाराच्या जाज्वल्य इतिहासाला कायम समोर ठेऊन जगणारा हाही एक विलक्षण राजपुत्र आहे. चारित्र्यवान गुणवान एकवचनी युवराज आहेत. रामचरित्र बघत असताना मला नेहमी संभाजीराजांची आठवण होते. त्यांच्यातले अनेक गुण राजेंच्या आचरणा मध्ये आहेत. व्यक्तिगत पातळीवर इतकी नीतिमत्ता सध्याच्या राजकारणात दुर्मिळ झाली आहे. 
वडील नाराज होतील म्हणून राजकारणातील अनेक संधी राजेंनी गमावल्या याबाबत अनेक प्रसंग सांगू शकतो. एकदा आम्ही जैसलमेर येथे गेलो होतो. तिथे राजस्थानातील सर्व राजघराण्याची वार्षिक बैठक असते त्यात राजे प्रमुख पाहुणे होते. छत्रपतींना देशात इतर राजांच्या तुलनेत किती मोठा सन्मान असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 
पण त्याच वेळी कोल्हापुरात राजवाड्यावर चंद्रकांत दादा पाटील आले आणि त्यांनी राजेंना केंद्रात मंत्री पदासाठी शुभेछ्या देखील दिल्या होत्या. माझ्या फोन वर देखील केंद्रातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी फोन केले होते. राजेंना केंद्रात मंत्री करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. पण राजेंनी ती ऑफर नाकारली. का? तर वडील म्हणजे शाहू महाराज नाराज होतील म्हणून. राष्ट्रपती नियुक्त खासदार पद स्वीकारले त्यावरच ते नाराज झाले होते आता मंत्री झाल्यावर अधिक नाराज होतील. अहो संभाजीराजांच्या जागी दुसरा कुणीही असता तर मंत्रिपदाची संधी दवडली असती का? यातून त्यांची पितृभक्ती दिसून येतेच पण घराण्याचे संस्कार देखील दिसून येतात. 
अश्या अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. राजेंना अनेकदा राजकीय भूमिका घेताना अडचणी आल्या त्याला बऱ्यापैकी शाहू महाराज काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? ही एकमेव आदरयुक्त भीती त्यांच्या मनात असायची. असे अनेकवेळा झाले आहे. अन्यथा ते राज्यात इतर कोणत्याही गोष्टीला किंमत देत नाहीत. सामान्य जनांमध्ये सहज मिसळणारा हा राजा वेगला आहे. स्वतःचे राजकीय भवितव्य अधांतरी ठेऊन हा राजघराण्याच्या प्रतिष्ठेला जपतो. मला खूप काही लिहावं वाटतंय, पण विस्तारभयास्तव आणखी प्रसंग लिहिणे योग्य होणार नाही. त्यावर एक वेगळे पुस्तक लिहावे लागेल. 
आज सांगण्याचे कारण हे की राजे हे एक आदर्श पुत्र आहेत. आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात विधिनिषेध शून्य राजकारण दिसून येत आहे. पक्षांच्या तोडफोडीचा ताजा इतिहास सर्वांच्या समोर आहे. वडिलांना डावलून मुलाचे राजकारण दिसते. चुलत्याचा पुतण्या राहिला नाही. अभूतपूर्व अशी स्थिती महाराष्ट्र आहे. राजकीय निराशा समाज मनात दिसून येत आहे. अश्या स्थितीत राजेंचे हे वेगळेपण जाणवते. हा श्रीरामचंद्राच्या आदर्षांवर चालणारा राजा दिसतो. रामाचे मंदिर बांधणे एक लेव्हल पर्यंत योग्यच आहे. पण रामाच्या अदर्षांवर काही पावले देखील चालणे हे फार कठीण असते.
संभाजीराजेंच्या समोर श्री शिवछत्रपती, राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श असतो. त्यावर चालण्याचा अट्टाहास राजे करतात. मराठ्यांच्या इतिहासाला एक उज्ज्वल नैतिक परंपरा आहे. ती परंपरा जोपासण्याचे प्रयत्न राजे करत आहेत. 
येत्या काळात संभाजीराजे नक्की या राज्याचे राजकारण नव्या उंचीवर घेऊन जातील. राज्याला किंवा देशाला नव्याने तो श्रीरामाचा, श्री शिवरायांचा, राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श स्वतःच्या जगण्यातून दाखवून देतील. त्यांचाही आदर्श समाजाला घ्यावासा वाटेल. राज्यात सध्याच्या राजकारणाकडे बघितल्या नंतर स्वराज्य पक्षाचे भवितव्य ठसठशीत पणे वेगळे जाणवेल. 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.