सभागृहाला नाव देणे हा ताराचंद हिकरे यांच्या कर्तृत्वाचा गौरव.!

माढेळी येथे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना.!

बल्लारपुर (का.प्र .) : ताराचंद हिकरे सोन्याच्या हृदयाचे नेते होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निःस्वार्थ पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
वरोरा तालुक्यात असलेल्या माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी देवतळे, चंद्रकांत गुंडावार, बाबासाहेब भागडे, डॉक्टर भगवान गायकवाड, माढेळीचे सरपंच देवानंद महाजन , उपसरपंच वनिता हुलके , प्रकाशजी मुथा,केशव बोरीकर,अमित चवले,गटविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘ताराचंद हिकरे यांचे नाव मिळाल्याने माढेळीतील सभागृहाची शान वाढणार आहे. त्यातून भविष्यातील पिढ्यांनाही ताराचंद हिकरे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा मिळत राहील.’ भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हिकरे परिवाराच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही देखील ना. मुनगंटीवार यांनी दिली. पक्षनिष्ठा कशी असावी आणि मनाचा मोठेपणा कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ताराचंद हिकरे आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यासोबत माझा संपर्क आला. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, अशी आठवणही ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितली.

निधी अपुरा पडणार नाही :

ताराचंद हिकरे यांचे व्यक्तिमत्व परिसासारखे होते. त्यामुळे त्यांच्या गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत आणि नागरिक जी काही मागणी करतील, ती पूर्ण करेन. माढेळी येथील सभागृहासह परिसरातील विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले. हिकरे हे सेवाभावाने कार्य करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहेत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

देखभालीसाठी समिती नेमावी :

माढेळी येथील सभागृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी समिती नेमण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. समाजातील गरीबांना अत्यंत माफक दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात यावे. सभागृहाच्या शेजारी मोकळी जागा आहे. तेथे सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात यावे. यासाठी लागणारे सहकार्य मी करेन, असेही मुनगंटीवार म्हणाले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाले रुपये ४०१ कोटीचे थकीत अनुदान.!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुनगंटीवारांनी मानले आभार .!
राज्यातील नगरपरिषदांच्या विकासाला मिळणार गती .!

बल्लारपुर : महाराष्ट्र राज्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे; केंद्रीय अर्थमंत्री ना. श्रीमती निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला ४०१ कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांना दिली.
महाराष्ट्र राज्याला पंधराव्या वित्तीय आयोगाच्या अनुषंगाने सन २०२३-२४ चे केंद्र शासनाकडून नगरपालिका प्रशासन व नगरपरिषदांकरिता मिळणारे अनुदान थकित होते. सदर अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगरपरिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा एकूण 421 ठिकाणी विविध विकास कार्य रखडलेली होती.
सदर निधी मिळवण्याकरिता ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री मा. ना. श्रीमती निर्मला सितारामन यांना पत्र लिहून आणि दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील विकास कामांकरिता या निधीची किती आवश्यकता आहे हे कळविले होते. यासंदर्भात ना ल. मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा केला. श्रीमती सीतारामन यांनी महाराष्ट्राला सदर निधीची आवश्यकता लक्षात घेऊन व ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीला योग्य प्रतिसाद देत तसेच दिनांक १३ ऑगस्ट २०२४ च्या पत्राची दखल घेत तातडीने कार्यवाही करून सदरचा निधी महाराष्ट्र राज्याला मिळवून दिलेला आहे.

गती, प्रगती आणि विकासाकरिता अग्रही मुनगंटीवार!

राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्या उत्तम प्रशासकीय कार्यासाठी, अभ्यासू पद्धतीने लोकोपयोगी कार्याकरिता आग्रही स्वभावासाठी सुपरिचित आहेत. अर्थमंत्री म्हणून यशस्वी पद्धतीने कार्यभार सांभाळणाऱ्या सुधीरभाऊंना प्रत्येक क्षेत्रातील निधीची तरतूद आणि ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा याचा परिपूर्ण अभ्यास आहे. भारतीय जनता पार्टी मधील लोकप्रिय नेता असलेले सुधीर मुनगंटीवार प्रशासनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या तळागाळातील विकास कामांकरिता सदैव तत्पर असतातच. जे काम हाती घेतले ते गतीने व्हावे, विकासात्मक व्हावे व सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा व्हावा ही त्यांची तळमळ असते. म्हणूनच महाराष्ट्राचा केंद्राकडे वित्तीय आयोगाच्या अनुषंगाने सन २०२३-२४ चा निधी मिळवून नगरपालिका प्रशासन व नगरपरिषदांकरिता मिळणाऱ्या अनुदानाचा विषय मार्गी लागावा असा त्यांचा आग्रह होता. सदरचे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगरपरिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये विविध विकास कार्य रखडलेली होती.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयामुळे व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील रमाई आवासच्या एकूण 864 घरकुलांना मंजुरी.!

बल्लारपुर : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने रमाई आवास योजनेंतर्गत तालुकानिहाय एकुण 503 घरकुलांना मंजुरी मिळाली असून नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. असे एकूण 864 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. 

रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या जागेवरती पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत आहे.
रमाई आवास (ग्रामीण) योजनेसाठी सन 2019-20 ते 2023-24 या आार्थिक वर्षाकरीता जिल्ह्यासाठी 21 हजार 902 चे उद्दिष्ट होते. त्यापैकी एकूण 20 हजार 378 घरकुलास मार्च 2024 पर्यंत मंजूरी देण्यात आलेली होती. त्यामधून एकूण 1524 शिल्लक उद्दीष्टापैकी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.  
त्याचप्रमाणे, सन 2018-19 ते 2023-24 मधील मंजूर लाभार्थीमधून सर्वेक्षणादरम्यान आजपर्यंत एकूण 521 लाभार्थी अपात्र आढळून आले असून सदर लाभार्थी रद्द करण्यात आले. त्याऐवजी नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. 

बैठकीत निर्णय:-

सदर बैठकीत सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 503 लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच संबंधित गटविकास अधिकारी यांना स्थळ पंचनामे होताच याद्या मंजुरीसाठी सादर करुन उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच सन 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षातील रद्द झालेल्या लाभार्थ्यांऐवजी पात्र लाभार्थी यादी मंजुरीसाठी सादर करणेस्तव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना दिलेल्या आहेत. 

361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थी (तालुकानिहाय घरकुल):

चंद्रपूर - 4, गोंडपिपरी -147, पोंभुर्णा -37, वरोरा - 51, नागभीड - 16, चिमूर - 88, जिवती - 4, ब्रह्मपुरी - 14

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.