जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात करा .!
चंद्रपूर (वि. प्र.) : चंद्रपूर हा कृषी प्रधान जिल्हा असून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आहे. रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू व रब्बी ज्वारी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन 2024-25 करिता चंद्रपूर जिल्ह्यात नवीन महसूल मंडळ स्थापन झाले आहे. रब्बी हंगामातील सदर पिके अधिसूचित नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगामात समाविष्ट करण्याची मागणी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट (Standing Crops) नैसर्गिक आपत्ती , उत्पन्नात येणारी घट, पूर, दुष्काळ, नैसर्गीक आग,वीज कोसळणे, वादळ, गारपीट,चक्रीवादळ इ. टाळता न येण्याजोग्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात घट आल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थिती, प्रतिकुल हवामान घटकांमुळे 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांची पेरणी / उगवण न होणे, काढणीपश्चात नुकसान ईत्यादी परिस्थितीमुळेमुळे आल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन 2024-25 करिता चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या महसूल मंडळानुसार रब्बी पिके अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त(कृषी), कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2024-25 अंतर्गत महसूल मंडळ व पिक अधिसूचित करण्यासाठी संबंधितांना आदेश निर्गमित करण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे.
जिल्ह्यातील नव्याने प्रस्तावित अधिसुचित मंडळ , मंडळ गट / तालुके व पिके :
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता नव्याने प्रस्तावित अधिसूचित तालुक्यामध्ये हरभरा पिकाकरीता चंद्रपूर, बल्लारपूर, नागभीड,ब्रम्हपूरी व पोंभुर्णा तर गहू पिकाकरीता चंद्रपूर,बल्लारपूर,वरोरा,भद्रावती,चिमूर, नागभीड आणि रब्बी ज्वारी पिकाकरीता वरोरा व गोंडपिपरी या तालुक्याचा समावेश आहे. ज्या तालुक्याचे संबंधित पिकाखालील क्षेत्र योजनेतील अटीव्दारा निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षा कमी असल्यास त्या तालुक्यातील महसूल मंडळांचा गट करुन समावेश करण्यात यावा असे नव्याने अधिसूचति करुन प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार हरभरा पिकाकरीता चिनोरा,साखरा राजा (ता.वरोरा), घोडपेठ,मुधोली,नंदोरी,भद्रावती,मांगली(ता.भद्रावती),गोंदेडा,आंबोली,वडाळा पैकू (ता.चिमूर), देवाडा,गोवरी (ता.राजुरा),नांदा, नारंडा (ता.कोरपना),गोंडपिपरी,धाबा,भंगाराम तळोधी (ता.गोंडपिपरी) यांचा समावेश आहे. तर गहू पिकाकरीता देवाडा,गोवरी (ता.राजुरा),नांदा, नारंडा (ता.कोरपना) यांचा प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगामात समावेश करण्याची विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.