एका मंडपात खासदार धानाेरकर तर दुसऱ्या मंडपात माजी नगराध्यक्ष धानाेरकर .!
बल्लारपुर (का.प्र.) :भद्रावती येथे सार्वजनिक गणपती विसर्जनात खासदार प्रतिभा धानोरकर व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर असे धानोरकर कुटूंबाचे दोन वेगवेगळे मंडप बघायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच अशाप्रकारचे चित्र बघायला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वरोरा विधानसभा मतदार संघातून भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी उमेदवारी मागितली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रविण काकडे हे देखील वरोरा येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. वरोऱ्याच्या उमेदवारीवरून कॉग्रेस पक्षात राजकीय वातावरण तापले असतांना भद्रावती येथे सार्वजनिक गणपती विसर्जन कार्यक्रमात धानाेरकर कुटूंबाचे दोन वेगवेगळे मंडप बघायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पर्यंत धानोरकर कुटूंबाचा एकाच मंडप राहायचा. त्या एकाच मंडपात खासदार प्रतिभा धानोरकर व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर एकत्र येवून गणपती मंडळांचे स्वागत करायचे. मात्र दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्युनंतर येथील चित्र बदलले आहे. गुरूवारी भद्रावती येथे सार्वजनिक गणपती विसर्जन कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कॉग्रेस पक्षाच्या वतीने स्वत:चा वेगळा मंडळ टाकला होता. त्यांच्या सोबत कॉग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यां होत्या. तर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी धानोरकर मित्र परिवार या नावाने स्वत:चा वेगळा मंडळ थाटून गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. अनिल धानोरकर यांच्या मंडपाच्या दर्शनी भागात प्रेरणास्थान म्हणून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे छायाचित्र दर्शनी भागात लावले होते. त्यांच्या मातोश्री, पत्नी व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती या धानाेरकर यांच्या स्वत:च्या गावात धानाेरकर कुटूंबाचे दोन स्वतंत्र मंडप लागल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अनिल धानाेरकर यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. कॉग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तरी लढणार नाही दिली तरी मित्रपक्षांच्या साथीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे सांगितले आहे. त्यामुळे भद्रावती - वरोरा विधानसभा मतदार संघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुक बघता धानाेरकर कुटूंब स्वत:च अशा प्रकारचे वातावरण तयार करित असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याला कारण लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिचेसाठी चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती. तेव्हाही मुलीला उमेदवारी देणार नाही, एकाच कुटूंबात उमेदवारी मिळणार नाही अशी भूमिका कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. ही पार्श्वभूमी बघता एकाच कुटूंबात उमेदवारीवरून पक्षात नाराजी नाट्य होवू शकते त्यामुळे आतापासूनच अशा प्रकारची पार्श्वभूमी तयार करून कुटूंबात मतभेद दाखवायचे आणि उमेदवारीवर दावा करायचा अशी रणनिती असल्याचेही बोलले जात आहे. काहीही असले तरी धानाेरकर कुटूंबातील मतभेद गणपती विसर्जनाच्या निमित्ताने प्रथमच असे समोर आल्याने राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरू झाली आहे.