समाज पाठिशी भक्कमपणे उभा असल्याचा दिला विश्वास .!
बल्लारपूर (का.प्र.) : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना गोलकर समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे सचिव महेश मॅकलवार, उपाध्यक्ष किरण चेनमेवार, संघटक प्रवीण भिमनवार, सदस्य कोमलवार, निलेश मेकलवार, विलास दंडीकवार यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन पत्र देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विविध संघटनांकडून मोठे समर्थन मिळत आहे. गोलकर समाज संघटनेच्या प्रत्येक अडचणीमध्ये श्री. मुनगंटीवार यांनी पाठिशी भक्कमपणे उभे राहून साथ दिली. गोलकर समाजभवनाकरीता शासनाकडून निधी खेचून आणला, यासाठी समाजबांधवांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे पत्रातून आभार मानले आहेत. पुढेही समाजाला असेच सहकार्य मिळावे व समाजाचा विकास व्हावा यासाठी समर्थन देण्यात येत असल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले आहे.
पत्रामध्ये गोलकर समाज संघटनेने श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख विकासपुरूष असा केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बल्लारपूरप्रमाणे विकासाची गंगा आणणारे दुसरे कोणीही लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही. एखाद्या लोकप्रतिनीधीला 50 वर्षांत जो विकास साधणे शक्य होणार नाही, त्यापेक्षाही कितीतरी अधिक विकासकामे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अवघ्या काही वर्षांमध्ये झाली आहेत, असा गौरवोल्लेख देखील संघटनेद्वारे करण्यात आला. या विकासकामांसाठी गोलकर समाज नेहमी आपल्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला असून भविष्यात देखील अशीच साथ देईल, असा विश्वास सुद्धा समाजाद्वारे व्यक्त करण्यात आला.
बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी परत एकदा, भरघोस मतांनी विजयी होऊन विधानमंडळामध्ये मोठ्या थाटात प्रवेश करावा, अशा शुभेच्छा देखील गोलकर समाज बांधवांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दिल्या आहेत.