बल्लारपुर (का.प्र.) : दुर्गापूरमध्ये रविवारी ख्रिश्चन समुदायाच्या आध्यात्मिक संजीवनी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पास्टर सुनील कुमार यांच्या आग्रहावरून बल्लारपूर विधानसभा भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली आणि प्रभूचे आशीर्वाद घेतले.
या वेळी त्यांनी ख्रिश्चन समुदायासाठी केलेल्या कार्याची आणि भविष्यात होऊ घातलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला. या वेळी पास्टर सुनील कुमार आणि त्यांच्या टीमने सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. पास्टर आणि उपस्थित अनुयायांनी मुनगंटीवार यांना शुभेच्छाही दिल्या. क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन. ख्रिश्चन समाजाची कुठलीही समस्या असेल तर ती माझ्यापर्यंत पोहचवा, ती सोडवण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले. या प्रसंगी पास्टर सुनील कुमार, पास्टर प्रकाश भगत, पास्टर बेंजामिन, जग्गू बोरकर, सायमन मानकर, माजी जिल्हा परिषद सभापती रोशनी खान, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा थोरात, रामपाल सिंग, देवानंद थोरात यांच्यासह सभेत मोठ्या संख्येने समुदायातील लोक उपस्थित होते.