मुल येथे राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन .!
मुल (वि.प्र.) : दररोज एकवीसशे रुपयांचा ऑक्सिजन आपण घेतो. ऐंशी वर्षांचे आयुष्य जगल्यास ६ कोटी १३ लक्ष २० हजार रुपयांचे ऑक्सिजन आपण घेणार. विजेप्रमाणे मीटर लागले नाही. अन्यथा हा ऑक्सिजन आपल्याला महागात पडला असता. त्यामुळे आयुष्यात आपण किमान २० हजार रुपयांची झाडे तरी लावायला हवी. झाडे लावण्याचा संकल्प हेच राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे उद्दिष्ट होय. त्यासाठी पर्यावरण रक्षणाचे कार्य स्वतःपासून सुरू करावे, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुल येथील मा. सां. कन्नमवार सभागृहात राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सदस्य सुयोग धस, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर, कोकण विभागाचे ब्रँड अॅम्बेसिडर विकास महंते,भाजप महासचिव डॉ. मंगेश गुलवाडे, नंदकिशोर रणदिवे,नम्रता ठेमसकर, दीपक भवर, सचिन वाघ, आसिया रिझवी, सोमनाथ कुताळ, रविंद्र पोटे, सुरेश चोपने, डॉ. अभिलाषा गावतुरे,तेजस्वीना नागोसे यांची उपस्थिती होती. डॉ. प्रीती तोटावर यांच्या 'जंगलातील शिलेदार' या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
पर्यावरणाचे रक्षण आज आपल्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यासाठी योगदान द्यायला हवे, असेही ते म्हणाले. मी वन मंत्री असताना पर्यावरण रक्षण ही एक चळवळ व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले. यामुळे २ हजार ५५० स्क्वे. किमीने हरित आच्छादन वाढले. देशात पहिला क्रमांक आपल्याला प्राप्त झाला. चार लिमका बुक रेकॉर्ड आणि दोन गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड मिळाले. ही जन आंदोलनाची चळवळ आपल्याला पुढे न्यावी लागेल, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
१६, १७, १८ जानेवारी या कालावधीत आपण आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन चंद्रपूरमध्ये घेत आहोत. अशा संमेलनांमध्ये आपण चर्चा करतो, चिंतन करतो, उद्दिष्ट ठेवतो. परंतु, त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचलो की नाही यावर आपण कधीही बोलत नाही. तुम्ही केलेल्या ठरावाची पूर्तता होते किंवा नाही, हे देखील तपासले पाहिजे, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
कर्करोगचे प्रमुख कारण प्रदूषण आहे. मनाचे पर्यावरण जेव्हा बिघडते तेव्हा प्रदूषण निर्माण होते. त्यामुळे अशा अधिवेशनांना मर्यादित न ठेवता यात प्रदूषणाचा देखील विचार करायला हवा. आयोजकांनी केवळ असे एक संमेलन घेऊन थांबायला नको. असे संमेलन वर्षभरात दोनदां तरी घेत राहायला हवे. या भागाचा आमदार म्हणून मी निश्चितच आपल्या सोबत आहे, असा शब्दही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.