पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

वीजसेवेच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त; आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला खेद .!

बल्लारपुर (का.प्र.) : पोंभुर्णा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शिक्षण, शेती, वैद्यकीय सुविधा, उद्योगधंदे आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. ही स्थिती असह्य झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आणि यंत्रणेमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की , “वीज वितरण यंत्रणेतील नियोजनशून्यता आणि उदासीनतेमुळे जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. विजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शाळा-महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया व इतर कामांमध्ये त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी हैराण झाले आहेत आणि लघुउद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंत्रणेकडून वेळेवर ट्रान्सफॉर्मर बदलले जात नाहीत, दुरुस्तीला वेळ लागतो त्यामुळे एकदा लाईट गेली की पुन्हा सुरळीत होण्यास प्रचंड वेळ लागतो. यासंदर्भात अनेकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत.
या संपूर्ण परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, यंत्रणेत तातडीने सुधारणा झाल्या नाहीत, तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा थेट इशारा आ. श्री. मुनगंटीवार यांनी विज वितरण कंपनीला दिला. तसेच, यंत्रणांनी जनतेच्या भावना समजून घेत तत्काळ कृती करावी आणि सुधारणा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करत प्रशासनाच्या वीजवितरण व्यवस्थापनावर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".