एकाच दिवशी ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना .. जनतेच्या प्रश्नांप्रती तळमळ आणि संवेदनशीलतेचा अभूतपूर्व प्रत्यय .!
बल्लारपुर (का.प्र.) : राज्य विधीमंडळाच्या इतिहासात आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस (दि. ४ जुलै २०२५) एक मैलाचा दगड ठरला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्बल ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना करून महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला. ही केवळ एक रेकॉर्डब्रेक कामगिरी नसून जनतेच्या प्रश्नांशी असलेली त्यांची असामान्य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे.
आ. मुनगंटीवार म्हणाले, "आजचा दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळ कार्यपद्धतीत एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे. याचे मला विशेष समाधान आहे . या अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकड्यांची मांडणी नाही, तर सामान्य जनतेच्या वास्तविक गरजांवर आधारित आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
मा. अध्यक्ष महोदयांनी "स्पिरिट ऑफ लॉ आणि स्पिरीट ऑफ लेटर" या तत्त्वांची आठवण करून देत विधेयक पुनर्स्थापनेला परवानगी दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. "हे विधानभवन 'लक्षवेधी भवन' बनत चालले आहे, पण आज तुम्ही अशासकीय विधेयकांसाठी वेळ दिलात, ही लोकशाहीसाठी आश्वासक बाब आहे," असे सांगत त्यांनी आशा व्यक्त केली.
आ. मुनगंटीवार यांनी सादर केलेली विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्यामध्ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो.
जनतेचे प्रश्न हेच आपल्या राजकारणाचे केंद्रबिंदू असावेत, ही भूमिका सातत्याने निभावणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे हे कृतिशील नेतृत्व विधीमंडळाच्या माध्यमातूनही पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
---------------
आ.सुधीर मुनगंटीवार खत वितरणातील गैरप्रकारांविरोधात उद्या देणार तक्रार !
शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा ठाम पवित्रा .. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात उद्या तक्रार दाखल करणार .!
बल्लारपूर : शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकाविरोधात आता कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे उद्या, शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड नामांकित कंपनीकडून वितरित केले जाते. मात्र, या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची "लिंकिंग" करून चिल्लर विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जाते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो, कारण त्यांना ही अनावश्यक उत्पादने खरेदी करूनच खत मिळते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाची स्थिती निर्माण होते.
या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या लूटप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. "शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणीही अधिकृत तक्रार देऊन उद्या करणार आहेत.