आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरोधात दिलेल्या लढ्याला मोठे यश! .. कोरोमंडल कंपनीवर गुन्हा दाखल; अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई .. आ. सुधीर मुनगंटीवार यांची आवाज उठविण्याची भूमिका ठरली निर्णायक .!
बल्लारपूर (का.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरोधात दिलेल्या कायदेशीर लढ्याला मोठे यश आले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार, दि. ५ जुलैला बल्लारपूर पोलीस ठाणे गाठून या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर कृषि अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले की, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनंतरही कोरोमंडल कंपनी शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करताना सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत होते. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत होते. याबाबत आ.सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी सचिव विकास रस्तोगी यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते, तसेच संबंधित कंपनीच्या विक्री व विपणन उपप्रबंधकाशीही संवाद साधून, चुकीचे व्यवहार थांबविण्याची स्पष्ट मागणी केली होती.
आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनासमोर ही लूट थांबवण्याची जोरदार मागणी केली होती. ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले नाही तर आंदोलनात्मक मार्ग अवलंबला जाईल. यासंदर्भात जिल्हा कृषि अधिकारी यांनीही तक्रार दाखल केली होती,त्यावरून शेतकऱ्यांच्या लूट करणाऱ्या कंपनी विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, खत विक्रीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला आता अटकाव लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहे.