वीज पडून बैलांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मिळवून दिली मदत .!

 

शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश .! 
बल्लारपूर (का.प्र .) : दिवसभर शेतात राबून जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावर संकट कोसळले अन् आ. मुनगंटीवार धावून गेले नाहीत, असे होणे नाही. जगाचा पोशिंदा दुःखात आहे हे कळल्यावर नेहमीप्रमाणे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चक्र फिरवले आणि मदत मिळवून दिली. आयुष्यभर मातीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्याचे सोने करण्याचा ध्यास आ. मुनगंटीवार यांनी घेतला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
बल्लारपूर तालुक्यातील मौजा हडस्ती, आसेगाव, कोठारी आणि कळमना येथील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं. वीज कोसळून बैल जागीच मृत्युमुखी पडले. कष्टाचा साथीदार गमावल्याने त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला. पुन्हा जिद्दीने उभे होण्याचे अवसानच गळून पडले. पण या दुःखावर एक मात्रा शोधण्याचे काम राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती कळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि दिनांक १३ ऑगस्ट रोजी, बल्लारपूर येथे, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चारही शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून आर्थिक मदत वितरित करण्यात आली. कोठारी गावचे दत्तू माधव काळे यांचा एक बैल वीज कोसळून मृत्यूमुखी पडला. त्यांना ३२ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. तर हडस्ती गावचे सुनिल नामदेव खोके यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले. त्यांना शासनातर्फे ६४ हजार रुपयांची मदत मिळाली. आसेगाव येथील कैलाश परशुराम कुळमेथे व कळमणा येथील हरीश्चंद्र झाडे यांच्याही शेतातील प्रत्येकी एक बैल मृत्यूमुखी पडला. त्यांनाही प्रत्येकी ३२ हजार रुपयांची मदत मिळाली. हे केवळ आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले अशी भावना व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 
आ. मुनगंटीवार यांनी दाखवलेली ही तत्परता, शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकीची जाणीव आणि प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडविणाऱ्या घटना आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना केवळ सांत्वन करून काम होत नाही, तर त्याला प्रत्यक्ष कृतीचीही गरज असते. तात्काळ आर्थिक मदत मिळवून देत या संवेदनशीलतेला आ. श्री. मुनगंटीवार यांनी कृतीची जोड दिली. त्याचेच हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘शेतकऱ्याच्या दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात आघाडीवर असलेले नेते म्हणजे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत,’ अशी उत्स्फूर्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

-----------------------------

बल्लारपूरमध्ये 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप .!

चंद्रपूर : बल्लारपूरच्या विकास प्रवासात ऐतिहासिक पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर, नाट्यगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूलन निवासी पट्टेवाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे,शहर अध्यक्ष रणजंय सिंग, समीर केने, जयश्री मोहूर्ले, राजू दारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ,तहसीलदार रेणुका कोकाटे, उपअधीक्षक भूमि अभिलेख अनिल देशमुख, अग्निशमन अधिकारी शुभम रत्नपारखी, नायब तहसीलदार श्री. फुलझेले आदींची उपस्थिती होती. 
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात माझा मतदारसंघ प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, क्रीडा संकुल, अभ्यासिका, सिमेंट रस्ते, छटघाट व विविध बगीचे अशा अनेक सुविधा उभारल्या असून, सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. बल्लारपूर मतदारसंघ हा विकासकामात सदैव आघाडीवर राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्रात 62 कोर्सेस सुरू होणार असून, यामुळे येथील बहिणींना शिक्षणात संधी व दर्जाची समानता मिळेल. स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत, शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी निर्माण करण्यात आली आहे. 
बल्लारपूरमधील साधारणतः अंदाजे 12 हजार कुटुंबे स्वतःच्या हक्काच्या जमिनीअभावी शासकीय योजना व बँक कर्जापासून वंचित आहेत. यासाठी झुडपी जंगल कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्रजी यादव यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. हा पट्टे वाटपाचा कार्यक्रम केवळ 210 पट्ट्यांपुरता मर्यादित न ठेवता, भविष्यातील सुमारे 12 हजार पट्ट्यांच्या वाटपाच्या महाअभियानाची सुरुवात आहे. कुटुंबाला स्वतःच्या हक्काचा घरपट्टा मिळाल्यावर त्यांचे अनेक प्रश्न कायमचे मार्गी लागतील, असा विश्वास श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".