प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" या पुस्तकाचे विमोचन .!
भद्रावती (वि.प्र.) : विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती द्वारा आयोजित जिल्हा साहित्य संमेलन भद्रावती येथे संपन्न झाले. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात अभिजात भाषा संवर्धन आणि विकास या विषयावर परिसंवाद आयोजित केला. या परिसंवादात "मराठी ही अभिजात भाषा असून तिच्या संवर्धनासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक पातळीवर समन्वय साधण्याची गरज आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांनी केले. ते भद्रावती येथे पार पडलेल्या जिल्हा साहित्य संमेलनात "अभिजात भाषा : संवर्धन आणि विकास" या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब माने मुंबई हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सविता सादमवार मराठी विभाग प्रमुख गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व प्रा.डाॅ परमानंद बावनकुळे होते. या वेळी गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. सविता सदमावार यांनी भाषेच्या ऐतिहासिक विकासक्रमाचा मागोवा घेत मराठी भाषेतील सृजनशीलतेचे व व्यावहारिकतेचे महत्त्व विशद केले. प्रा. डॉ. परमानंद बावणकुळे मराठी विभाग प्रमुख पोंभूर्णा यांनी भाषेच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करत मराठीला लोकाभिमुख करण्याची गरज व्यक्त केली. याची सुरुवात आपण आपल्या घरातूनच केली पाहिजे असे आवाहन केले.
जिल्हा साहित्य संमेलनाच्या या परिसंवादाला संमेलनाध्यक्ष मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ गजानन कोठेवार अध्यक्ष ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी भाषेच्या विकासासाठी नव्या पिढीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमात डॉ. ज्ञानेश हटवार लिखित "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. ग्रामीण संस्कृतीतील क्रांतीची बीजे दाखवणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या साहित्य संमेलनात बोर्ड परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयात ९० पेक्षा अधिक गुण घेतले त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. यशवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ माधवी भट चंद्रपूर यांनी केले तर आभार प्रदर्शन वि सा संघ शाखा भद्रावती चे अध्यक्ष डॉ सुधीर मोते यांनी केले.
कार्यक्रमाला विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक मंडळी उपस्थित होते. त्यात प्रा. डॉ. विठ्ठलराव चौथाले, प्राचार्या विजया मने, गडचिरोली, प्रा. यश पवार यवतमाळ, प्रा. पवन कटरे, गोंदिया, प्रा.संजय लेनगुरे, भंडारा, प्रा.ओमप्रकाश ढोरे, अमरावती डॉ विजय सोरते, डॉ सुधीर रायपूरकर नागपूर आणि विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, शिक्षक , विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार व मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसंवादात झालेल्या चर्चेमुळे अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, भविष्यासाठी नवे दृष्टिकोन समोर आला.
हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावतीच्या सर्व पदाधिकारी तसेच झाडेबोली साहित्य मंडळ भद्रावतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
