साहित्य संमेलन नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देते - डॉ. प्रकाश महाकाळकर

भद्रावती (वि.,प्र.) : विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती द्वारा आयोजित जिल्हा साहित्य संमेलन श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे नुकतेच संपन्न झाले. दिवसभर भरगच्च झालेल्या कार्यक्रमाचे समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना कवी डॉ प्रकाश महाकाळकर, बीइओ, पंचायत समिती, भद्रावती यांनी "साहित्य संमेलन हे वैचारिक रसद पुरवते व नवोदित साहित्यिकांना ऊर्जा देऊन प्रेरणा देण्याचे कार्य करते," असे प्रतिपादन केले.
विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावतीच्या वतीने भद्रावती येथे एक दिवशीय जिल्हा साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. या साहित्य संमेलनात उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, खुले कवी संमेलन व समारोप असे विविध सत्र दिवसभर मान्यवरांच्या उपस्थितीत चालले. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कवी डॉ प्रकाश महाकाळकर, बीइओ, पंचायत समिती, भद्रावती हे व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी हे साहित्य संमेलन ज्यांच्या स्मृतींना समर्पित केले असे स्वर्गीय प्रा. डॉ सुरेश परसावार यांच्या सहचारिणी श्रीमती अर्चनाताई परसावार याचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भद्रावती ही ऐतिहासिक, धार्मिक नगरी आहे. एवढेच नाही तर ती साहित्यिक नगरी सुद्धा आहे. भद्रावती शहरात अनेक साहित्यिक उपक्रम राबवले जातात. यातूनच नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळते, असे मार्गदर्शन कवी डॉ प्रकाश महाकाळकर , बीइओ, भद्रावती यांनी केले. "ग्रंथदिंडी पासून सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात उद्घाटन सत्र, मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, निमंत्रित कवी चे कवी संमेलन, खुले कवी संमेलन अशा दिवसभर चाललेल्या भरगच्च कार्यक्रमानंतर समारोपीय कार्यक्रमाला सुद्धा साहित्यिक मंडळी व श्रोते मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत, हे या साहित्य संमेलनाचे खरे यश आहे," असे वक्तव्य साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर यांनी केले. माननीय श्री प्रदीप दाते अध्यक्ष वि. सा. संघ नागपूर, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, चिटणीस वि.सा.संघ नागपूर, विजयाताई मारोतकर नागपूर, प्रा. बाळासाहेब माने मुंबई, डॉ गजानन कोठेवार अध्यक्ष ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य वर्धा, प्रा. डॉ विठ्ठलराव चौथाले गडचिरोली , चुडाराम बल्लारपुरे गडचिरोली इत्यादी साहित्यिक, मान्यवर मंडळी सकाळपासून उपस्थित होते.
या जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती गुंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर शेंडे यांनी केले. या साहित्य संमेलनात विदर्भासह अनेक जिल्ह्यातील साहित्य, कवी, मराठी प्रेमी शिक्षक, प्राध्यापक, रसिक श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाच्या यशस्वीते साठी विदर्भ साहित्य संघ भद्रावती चे समस्त पदाधिकारी, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती चे समस्त पदाधिकारी, तसेच साहित्य प्रेमी, मित्र मंडळींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".