बल्लारपूरमध्ये रणरागिणी हिरकणी फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा .!
बल्लारपूर (का.प्र.) : जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी हिरकणी फाउंडेशन, बल्लारपूर यांच्या वतीने मार्कण्डेश्वर हॉल, गोरक्षण वॉर्ड येथे प्रेरणादायी व विविध उपक्रमांनी परिपूर्ण असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद बल्लारपूरच्या अध्यक्षा मा. श्रीमती अलका अनिल वड़ई जी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. मनस्विताताई संदीप गी-हे (नगरसेविका, महानगरपालिका चंद्रपूर व अध्यक्ष – जिजा फाउंडेशन) तसेच अॅड. मेघा भाले मंढा (सभापती, महिला व बालकल्याण समिती, नगरपरिषद बल्लारपूर) उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून मा. वैशाली जोशी (अध्यक्ष, भाजप महिला आघाडी) आणि डॉ. सुविधा प्र. फुलझेले (MBBS, MD – GMC नागपूर, मधुमेह व हृदयविकार तज्ज्ञ) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या मा. चैतालीताई खटी यांनी “मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाची धनी – रणरागिणी झाशीची राणी” हा प्रभावी संगीतबद्ध एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी समाजकार्यात व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा “हिरकणीचा सत्कार” करण्यात आला. यामध्ये समाजसेविका सौ. गायत्री अनिलकुमार रामटेके (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष – Human Rights Association of India), सिस्टर विनया शेलके (फाउंडर प्रेसिडेंट – दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल, CBSC, बल्लारपूर) तसेच जोशना बाबुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान “हिरकणी सखी संपर्क निर्देशिका (Directory)” चे विमोचन करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण झाले. उपस्थित मान्यवरांनी महिलांनी शिक्षण, समाजकार्य व नेतृत्वाच्या क्षेत्रात पुढे येऊन समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल सालवे यांनी अतिशय सुंदर व प्रभावी पद्धतीने केले.
हा कार्यक्रम रणरागिणी हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सपना पवन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक सचिव अनुराधा वैभव जोशी तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
