दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीत ग्राहकांची फसवणूक; वस्तूही नाही अन् पैसेही परत नाहीत.!
बल्लारपुर (का.प्र.) : दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स आणि कमी किमतींचे आमिष दाखविले जात आहे. मात्र, अशा ऑनलाइन खरेदीत ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.ऑनलाइन स्क्रीनवर अधिक वस्तू दाखवून कमी किमतीत खरेदीचे आमिष दिले जाते; मात्र प्रत्यक्षात पार्सलमधून अपेक्षेपेक्षा कमी किंवा वेगळ्याच वस्तू मिळत असल्याचे प्रकार घडत आहेत.
विशेष म्हणजे, वस्तू परत केल्यानंतर पैसे ४८ ते ७२ तासांत परत करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, मुदत उलटूनही ग्राहकांना ना पैसे मिळतात, ना वस्तू!
असाच प्रकार बल्लारपूर येथील एका कुटुंबासोबत घडला आहे. दिवाळीनिमित्त ऑनलाइन घरगुती वस्तूंची खरेदी केली असता, जाहिरातीत दाखविलेल्या ऑफरच्या अगदी विपरीत वस्तू प्राप्त झाल्या. त्यानंतर पैसे परत मिळावेत म्हणून वस्तू परत करण्यात आल्या. कंपनीने ४८ तासांत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र चार दिवस उलटूनही अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत.
ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ग्राहकांची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष घालावे, तसेच ग्राहकांनीही आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी न पडता सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
