बोईसर परीसरातील औषध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी विशाखा समित्यांचे उपसभापतींचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस व कामगार विभागास निर्देश!
पालघर (जगदीश काशिकर) - पालघर हा जिल्हा संवेदनशील आहे. ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निमित्ताने अनेक परप्रांतीय लोक येत आहेत. अल्पवयीन मुलामुलींच्या विवाहांस प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकल महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या पाहिजेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कंपन्यांमध्ये महिला वर्ग काम करीत आहे. या आणि इतर सर्व ठिकाणी असलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशाखा समित्या स्थापन करण्यात याव्यात. कृषी विभागाच्या वतीने सर्वच शेतकरी एकल महिलांना बियाणे वाटप करणार असल्याचे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. पालघरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. खा. डॉ. राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी माणिकराव गुरसाल, पोलिस अधीक्षक पाटील उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी या बैठकीत जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा, कोवीड काळातील एकल महिलांच्या विकास कामांचा आढावा घेतला. महिलांच्या कामाच्या ठिकाणी होत असलेल्या छळाबाबत यावेळी आ. श्रीनिवास वनगा यांनी लक्ष वेधले. अनोळखी व्यक्तींकडून महिलांना फसवून लग्नाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची यावेळी माहिती समोर आली. यावर सामाजिक प्रश्नावर काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. यासाठी सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात यावी. शैक्षणिक संस्थांमध्ये सेफ कॅम्पस संकल्पना राबविण्यासाठी पोलिस प्रशासन आणि प्राचार्य यांची एकत्रित बैठक घ्यावी. विद्यार्थिनींच्या ग्रुपमध्ये प्रत्येकी एक पोलिस जोडून देण्यात यावेत. सार्वजनिक आस्थापना मध्ये विशाखा समितीची स्थापना व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थिनींना समजेल अशा सुरक्षा विषयक माहितीचे स्थानिक भाषेत माहितीपत्रक वितरित करावे अशी सूचना खासदार राजेंद्र गावित यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी एकल महिलांच्या पतीच्या नावे असलेल्या मालमत्ता या महिलांच्या नावे करण्याबाबतच्या सूचनेवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुरसाळ यांनी तयारी दर्शविली. जिल्ह्यात महिला भवन उभारण्याबाबत जूनच्या शेवटच्या आठवड्यात बैठक घेऊ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.