'अंधश्रद्धा आणि भोई समाज,..!

अंधश्रद्धा हा मानवी जीवनाला मिळालेला मोठा शाप आहे. हा शाप म्हणजे मूर्तिमंत विषारी साप आहे. एक वेळेस साप बरा पण हा अंधश्रद्धेचा साप अत्यंत घातक आहे. साप माणसाला एकदाचा चावेल आणि मारेल पण परंतु अंधश्रद्धेचा सापाने मानवी जीवनाच्या अनेक पिढ्या विषमय करून बरबाद केल्या आहे.अंधश्रद्धेचे भूत जसे  अशिक्षित लोकांच्या मानगुटीवर बसलेले आहे. त्याचप्रमाणे ते सुशिक्षित लोकांच्या सुद्धा मानगुटीवर बसले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडलेली संत भीमा भोई जयंती उत्सव होय. जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठेवणे व ती मानणे म्हणजे अंधश्रद्धा सुसक्षित व अशिक्षित दोन्ही याच्या आहारी गेलेले आहेत.  त्यांचावर  अंधश्रद्धेचा मोठा प्रभाव आहे. अशिक्षित माणूस अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेला हे आपण समजून घेऊ परंतु  सुशक्षित सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. याला काय म्हणायचे! आपण कितीही घसा कोरडा करून सांगितले की अमुक गोष्ट खोटी आहे. यावर विश्वास ठेवू नका संत भीमा भोई आपले नाही त्यांचा आपल्या समाजाशी काहीही संबंध नाही. आपल्या समाजासाठी त्यांचे कोणतेच सामाजिक योगदान नाही. फक्त त्यांच्या नावासमोर भोई हा शब्द लागला आहे म्हणून आपल्या अंधश्रद्धाळू व सुशिक्षित समाजाने संत भीमा भोई यांना डोक्यावर घेतले आहे.त्यांची मंदीर उभारल्या जात आहे. त्यांची  जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात  साजरी केली गेली. विशेषता पश्चिम महाराष्ट्रात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. पुणे व नाशिक सारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत शहरात सुद्धा हा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. बऱ्याच ग्रामिण व शहरी भागातील   सुशक्षित मंडळी सुध्दा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. परंतु  संत भीमा भोई आपले नाही, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी त्यांचे कोणतेच सामाजिक योगदान नाही हे आपल्या भाषणात सांगण्याचं कोणी धाडस केल्याचं वाचनात आले नाही. बंधुनो जयंतीच करायची आहे तर फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सावित्रीबाई फुले या समाज सुधारकांची जयंती साजरी करा. भोई  समाजाला ज्यांच्यामुळे आरक्षण मिळाले त्या  स्वर्गीय खा.जातिरामजी बर्वे यांची जयंती साजरी करा. परंतु केवळ अज्ञानापोटी व सामाजिक स्पर्धा म्हणुन ज्या  संताचा आपल्याशी कवडीमात्र संबंध नाही. समाजसुधारनेत त्यांचं योगदान नाही  अश्या संतांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आपण आपला वेळ व पैसा खर्ची  घालने यासारखे दुसरे कोणते महापाप नाही. याला अंधश्रद्धा नाही तर काय म्हणायचं? आपण कोणत्याही गोष्टीची चिकित्सा न करता अंध अनुकरण करतो. कुणी खरं सांगितलं त्यावर विश्वास बसत नाही. शब्द प्रामाण्य आणि अचिकित्सा हे अंधश्रद्धा प्रक्रियेचे दोन प्रधान घटक आहे. अंधश्रद्धा हा एक मानसिक दुबळेपणाआहे. आपल्या भोई समाजात याचे प्रमाण जास्त आहे.  कारण अज्ञान व शिक्षणाचा अभाव शिकलेली मंडळी अशिक्षित समाजाला योग्य मार्गदर्शन करत नसल्यामुळे आपल्या समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत आहे. फक्त अनुसरण आणि अंध विश्वास  या संघटनेने केले म्हणून मी का करू नये फक्त सामाजिक स्पर्धा सुरू आहे. परंतु यामुळेच आपल्या समाजाचे मोठे नुकसान होत आहे. स्पर्धाच करायची आहे तर शिक्षणाची करा. आय. ए. एस. आय.पी.एस. अधिकारी होण्याची करा प्रत्येक गावातून भोई समाजाचा एक तरी प्रशासकीय सेवेत जाणारा मोठा अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर कसा होईल यासाठी प्रयत्न करा. आपलं गाव व आपला समाज पूर्ण साक्षर कसा होईल  याची स्पर्धा करा. आपल्या समाजाच्या वस्तीत वाचनालये उघडा जिथे आपल्या पोरांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. परंतु आपण आपला वेळ पूजा व मंदिर बांधण्यात खर्ची घालत आहे. अंगारे, दुपारे, गंडे, दोरे वगैरे प्रकार नरबळी, पशुबळी अशा पद्धती आपल्या समाजात जास्त रूढ होऊन बसलेल्या आहेत त्याचे कारण अज्ञान अशिक्षितपणा भूत पिशाच्च बाधा  देवाचा किंवा देवतेचा कोप, मूळ पुरुषांचा दोष वगैरे वगैरे काल्पनिक भयगंड याच्या  आहारी आपला समाज गेलेला आहे. सुसक्षित मंडळी आपल्या उघड्या डोळ्याने हे सगळं पाहत असताना सुद्धा या प्रकाराला अजिबात विरोध करीत नाही. उलट त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात.स्वतः  कर्मकांडात सहभागी होतात. म्हणूनच  आपला समाज दिवसेंदिवस  सर्वच क्षेत्रात मागे पडत चाललाआहे.  तात्पर्य शाळा व कॉलेजमधून मिळणारे शिक्षण अंधश्रद्धेशी  मुकाबला करण्यासाठी समर्थ ठरत नाही. आपल्या  समाजासमोर एखाद्या गोष्टीची वास्तविकता ठेवल्यानंतर सुद्धा जेव्हा समाज असा वागतो व सुशिक्षित लोक  सुद्धा त्याचे अनुकरण करतात तेव्हा प्रबोधन हा शब्द निरर्थक वाटायला लागतो. समाज प्रबोधन करणाऱ्यालाच मुर्खात काढले जाते. वाचन श्रवण व चिंतन हे ज्ञानाचे दरवाजे होत जी माणसं हे ज्ञानाचे दरवाजे स्वतःहून स्वतःसाठी बंद करून ठेवतात ती माणसे नसून दोन पायाचे पशु होतं. हे दोन पायाचे पशूच सामाजिक जीवनात अनेक समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. उत्कर्ष व उन्नती याच्या आड येणाऱ्या अंधश्रद्धेला नष्ट करण्याचा उपाय एकच आहे. तो म्हणजे साक्षरता व ज्ञान संपादन होय शहाणपणा जिथून उदयाला येते ते ज्ञान होय आपल्या भोई समाजात साक्षरतेचे प्रमाण वाढणे ही काळाची गरज आहे. Wisdom is the surest solution to all Sorts of problem in world right from A to Z

सी. एम. लोणारे  (संपादक) भोई गौरव (मासिक)


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.