चंद्रपूर तालुक्यातील ५० आरो वॉटर एटीएमची देखभाल व दुरुस्ती पुढील दहा वर्षे महानिर्मिती कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून करावी : आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत केंद्र परिसरातील विविध मागण्यांकडे वेधले लक्ष .. त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांचे आश्वासन
बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर तालुक्यात महानिर्मिती कंपनी च्या सी.एस.आर. निधी अंतर्गत ५० आर.ओ. वॉटर एटीएम प्लांट बसविण्यात आले होते. त्यातील काही बंद पडलेले असल्यामुळे नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे सदर ५० प्लांटसाठी पुढील १० वर्षाकरिता सुरू करण्याचे व देखरेख करण्याचे काम करणे आवश्यक आहे. यासंदर्भात त्वरित मान्यता देण्याचे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत केंद्र परिसरात आवश्यक अन्य मागण्याबाबत देखील त्वरित कार्यवाही करण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी निर्देशित केले .ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांनी याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांची यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व चर्चा केली .बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राच्या परिसरातून मोठे नाले वाहत असून पावसाळयात सदर नाल्यांचे पाणी आजुबाजुच्या वस्तीत शिरत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नाल्याच्या काठावर झाडझुडपे वाढलेली असून त्याचा सुध्दा त्रास लोकांना होत आहे. सदर समस्या सोडविण्यासाठी नाल्याचे अस्तरीकरण व निरीक्षण तसेच रस्त्याचे कामे करणे आवश्यक आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राजवळ कर्मचारी आणि मजुरांच्या वसाहती आहेत. त्यांच्या सोईकरिता दुर्गापूर रस्त्या शेजारी बस स्थानक व मोठया सामाजिक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून सभागृहाचे बांधकाम मंजूर करणे आवश्यक आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राच्या वसाहतीसाठीच्या दुरूस्ती करीता रू.१०० कोटी निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ८० टक्के कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या पण त्यापैकी अधिकारी तसेच कामगार मनोरंजन केंद्राची निविदा प्रक्रिया अजुनपर्यंत पुर्ण झालेली नाही. त्यासोबतच टाईप सी,डी.ई चे क्वॉर्टरचे दुरूस्तीचे काम सुध्दा सुरू करणे गरजेचे आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राची सुरक्षा भिंत दुर्गापूर ताडोबा रोडवर आहे. या भिंतीलगत दुकानाच्या गाळयांचे बांधकाम केल्यास प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याअनुषंगाने सदर दुकानाच्या गाळयाचे बांधकाम करण्याकरिता नियोजन करण्यात यावे असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
या सर्व बाबी तपासून त्वरित महानिर्मिती कंपनीच्या सीएसआर निधीतुन या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांनी दिले.यावेळी भाजप नेते रामपाल सिंग, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे यांची उपस्थिती होती.