सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी;आत्महत्या रोखण्यासाठी गृह विभागाचा निर्णय..!
मुंबई (जगदीश काशिकर) - राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 19 दिवस झाले आहे. तरीही अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यातच विविध कामांनी अनेक जण मंत्रालयात येत असतात व निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतात. ही लोक पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक व रॉकेल घेऊन येतात आणि ते प्राशन करण्याचा किंवा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्नही बऱ्याचदा केला जात असतो. या घटनांना आता चाप लावण्यासाठी मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे.
आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश करताना सामान्य नागरिकांच्या खिशात तंबाखू व गुटख्याच्या पुड्या आहेत का ? याचा शोध घेतला जात होता. परंतु, आता पाण्याच्या बाटल्यांचाही शोध पोलिसांनी सुरू केला असून पाण्याच्या बाटल्या असल्यास प्रवेशद्वाराजवळ काढून ठेवले जात आहेत. काही दिवसापूर्वी मंत्रालयात येऊन विष प्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये. यामुळे गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातल्याची माहिती आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र नाराजी उमटत असून मंत्रालयात आत्महत्यांच्या प्रयत्नामध्ये वाढ झाल्याने अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या विविध मागण्या सरकारने मान्य कराव्या, यासाठी अनेकांकडून मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या बाटलीतून रॉकेल किंवा एखाद रसायन किंवा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याची गंभीर दखल आता राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतली असून मंत्रालयात यापुढे प्रवेश करणाऱ्या सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सध्या मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना आकाशवाणी समोरच्या प्रवेशद्वारा जवळूनच प्रवेश देण्यात येत आहे. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकाकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याचवेळी पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्याची मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.