ओला दुष्काळ घोषीत करून त्वरित मदतीची मागणी..

भद्रावती (ता.प्र.) - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 339 घरांचे पडझडीने नुकसान झाले.अनेकांना पुराचा फटका बसला व नुकसान झाले. त्यासोबतच भद्रावती – वरोरा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून अनेकांची पिके वाहून गेली आहेत. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामे करून शेती, पडझडीने घरांचे नुकसान, मनुष्य व पशुधन हानीची नुकसान भरपाई देण्याची  मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

आधीच दोन वर्षे कोरोना काळात जनजीवन विस्कळीत झाले होते. समाजातील सामान्य नागरिक त्रस्त होता. कोरोना नंतर समाजाची स्थिती कशीतरी सावरण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पुरस्थितीमुळे आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी- बियाणे खरेदी केले होते. मात्र पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील लागवड केलेली पिकेही वाहून गेली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. परंतु कर्जाचा पैसा हा शेतीत लावल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटात आधार देण्याची मागणी धानोरकर यांनी  मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

वरोरा – भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. त्यासोबतच तालुक्यातील मोठा भाग हा ग्रामीण आहे. या भागातील सुमारे 339 घरांची पडझड झाली आहे. त्यांच्या निवासाचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. त्यासोबतच शेतकरी शेतीसोबत पाळीव जनावरे देखील पाळत असतात. परंतु या पुरामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे वरील बिकट परिस्थितीचा विचार करता शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिंदे यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी व दिलासा देण्याची मागणी  आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.