दोन दिवसात आदेश काढणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन..!

उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवावे व धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - आ. सुधीर मुनगंटीवार

धानाला बोनस जाहीर करण्याबाबत सुद्धा चर्चा..

मुंबई (जगदीश काशिकर) - खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.उपलब्ध असणारे पाण्याचे साधन वापरून त्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली आहे.त्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये धानाचे उत्पादन लक्षणीय होण्याची शक्यता आहे.हे धान विकुन खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे.परंतु यावर्षिचे मार्केटिंग फेडरेशन द्वारे निश्चित करण्यात आलेले धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प आहे.त्यामुळे सदर धान उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मार्केटिंग फेडरेशन च्या माध्यमातून उन्हाळी  हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी  माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली.येत्या 2 दिवसात याबाबत आदेश निर्गमित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.


यावर्षी मार्केटिंग फेडरेशन ने धान खरेदीसाठी प्रति शेतकरी 8.24 क्विंटल इतके उद्दिष्ट निश्चित केले आहे.या उद्दिष्टाच्या माध्यमातून उन्हाळी  हंगामातील धान लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याने हे धान उत्पादक शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मागील वर्षीचे धान खरेदीचे उद्दिष्ट प्रति एकरी 11 क्विंटल होते.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षिची प्रति शेतकरी खरेदीची मात्रा अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या खरेदी निकषानुसार चालू वर्षीचे धान खरेदीचे उद्दिष्ट ठरविणे आवश्यक आहे. या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची आवश्यकता आहे. गेली काही वर्षे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत आहेत . त्यामुळे या मागणी कडे दुर्लक्ष होणे संयुक्तीक नाही.याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा व उद्दिष्ट वाढवावे अशी मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान केली.

"धानाला बोनस जाहीर करण्याबाबत चर्चा" - धानाला बोनस जाहीर करण्याबाबत गेल्या सरकारने नकारात्मक भूमिका विधानसभेत घेतली होती. धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा असेही आ. मुनगंटीवार या चर्चेत म्हणाले. याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".