सामान्यांचा नाथ !!

मुंबई (जगदीश काशिकर) - शिवसेनेत कोण गद्दार, कोण खुद्दार हा विषय आता मागे पडला आहे. तसेच सरकार वैध का अवैध याबाबतही आता चर्चा करण्यात अर्थ नाही. ते सर्वोच्च न्यायालय बघेल. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवू लागली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे हे आपल्यातले आणि आपले मुख्यमंत्री आहेत अशी भावना सामान्यातला सामान्य माणूस व्यक्त करू लागला आहे. त्यामुळे भविष्यात बाकीचे मुद्दे गौण ठरतील. बंडखोरीनंतर काही काळ असलेली उद्रेकाची, संतापाची लाट आता जवळपास ओसरली आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानभूतीही आता तितकीशी राहिलेली दिसत नाही. 

याला कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद असले तरी आपल्यातला 'कार्यकर्ता' कायम ठेवला आहे. त्यांच्यातील निर्णय क्षमता, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती, विरोधकांवर अगदी सहजपणे, शांत राहून पण मुत्सद्दीपणा दाखवत पलटवार करण्याची क्षमता यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील लोकं समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेतील काही मंडळी सोडता आता सर्वच राजकीय पक्षात शिंदे यांचे 'फॅन' दिसू लागले आहेत. शिंदे यांची एकंदर कार्यपद्धती बघितल्यानंतर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने लोकचळवळीतील कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे हे मान्य केले पाहिजे. अगदी सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या छायेत एकनाथ शिंदे झाकोळून जातील असे आमच्यासह अनेकांना वाटत होते, पण गेल्या काही दिवसातील त्यांनी घेतलेले निर्णय, मांडलेली भूमिका आणि विशेषतः विधानसभा अधिवेशनात आपणही तेल लावलेले पैलवान आहोत, आपल्याकडेही ' राजकीय  टॅलेंट ' आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे हे आता विरोधकही कबूल करतात. कोर्टकचेरी, कोण खरा, कोण खोटा या वादात न पडता एक मात्र नक्की वाटते की पूर्ण अडीच वर्षे सरकार टिकले तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून स्वतःची एक वेगळी आणि ठाशीव प्रतिमा निर्माण करतील. आत्ताचा त्यांचा आत्मविश्वास बघता ते पुढील काही वर्षे तरी राज्याचे राजकारण आपल्याभोवती फिरते ठेऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.