प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत..!

मुंबई (जगदीश काशिकर) - प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत असे  म्हणायचे, विश्वास ठेवण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. व्रत वगैरे कल्पना तर बावळटपणा ठरल्या जेव्हा पत्रकारिता हा व्यवसाय झाला. अर्थात बदलत्या काळानुसार काही प्रमाणात त्यात बदल होणे चुकीचे ठरत नाही. पण त्याचा आत्मा तरी त्यातल्या त्यात चौथ्या स्तंभाचा आधार वाटेल इतपत प्रामाणिक होता, मात्र आता जे चालू आहे तो निव्वळ बाजारूपणा आहे. बडी वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स यांनी लाजलज्जा, शरम सोडली आहे आणि त्यांनी आपला लिलाव मांडला आहे. (तुलना करून येथे मी वारांगनांचा अपमान करू इच्छित नाही) विशेषकरून टीव्ही चॅनेल्सनी तर ताळतंत्र सोडला आहे. दिवसरात्र दळण दळण्यासाठी त्यांना चांगले पौष्टिक धान्य नकोय तर कुजलेले, किडलेले धान्य दळत बसून वर आणखी आमचाच आटा कसा उत्तम आहे हे सांगण्याचा निलाजरेपणा चालू आहे. टीव्ही चॅनेल्सचा धुमाकूळ पाहून चौथा स्तंभ तोडून मोडून त्याचा एवढासा दंडुका घेऊन याचा चावा घे, त्याचा चावा घे असे फिरणारे, विशेषकरून वाचाळ राजकारण्यांच्या पाठी लाचारासारखे पळणारे प्रतिनिधी बघून त्यांची कीव करावीशी वाटते. 

अर्थात हा दोष पूर्णपणे त्यांचा नाही. खरा दोष आहे तो मालक आणि संपादकांचा...प्रतिनिधी हा शेवटी नोकरी करतो. तो मालक आणि संपादक यांच्या सूचना पाळतो , आदेश पाळतो. किंबहुना त्याला त्या पाळाव्याच लागतात. हा सर्व बाजार थांबवायचा असेल तर आधी मालक आणि संपादकांनी आपली डोकी ठिकाणावर आणावीत. त्यांना नुसता टीआरपी आणि पैसाच मिळवायचा असेल तर त्यांनी पत्रकारितेच्या वांझ गप्पा मारू नयेत. आपण बड्या , श्रीमंत, मसल पॉवर असलेल्या राजकारण्यांचे गुलाम आहोत असे जाहीर करावे. मालक आणि संपादक यांना अजून  थोडी जरी चाड असेल तर त्यांनी या असल्या बिनकामाच्या , वायफळ बडबड करणाऱ्या, भ्रष्ट आणि संधीसाधू राजकारण्यांचे थोबडे दाखवायचे बंद करावे. तुम्हाला काय बाईट (चावे) घ्यायचे आहेत ते तुम्ही स्वतःपुरते घ्या.  जनतेला वेठीस धरू नका. सतरावेळा पक्ष बदलणारे, सत्ता संपत्तीसाठी वेडेपिसे झालेले, जनतेला खोटी आश्वासने देऊन,  त्यांच्या जात, धर्म, देव आदी भावनांना हात घालून स्वतःची तुंबडी भरणारे नेते कशाला दाखवता एकसारखे? देशातले अन्य प्रश्न संपले का की राजकारण सोडून बाकीच्या क्षेत्रातले चांगले लोक मेलेत?

वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सच्या मालकांनी, संपादकांनी आता एकत्र येऊन या गोष्टींना किती प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची नक्कीच गरज आहे. राजकीय नेते ( वायफळ बोलणारे ), त्यांची वादग्रस्त विधाने, टीकाटिप्पणी यांना पहिले पान किंवा हेडलाईन्स मध्ये जागाच देऊ नका. त्यांना महत्व देऊ नका. त्यांना शेवटचे स्थान द्या आणि मुळात दंडुके घेऊन त्यांच्या पाठी पळू नका. त्यांना हवे ते विचारले, त्यांना हवे तेवढेच दाखवले,  छापले तर ते खुश.. थोडे अडचणीचे मुद्दे येऊ दे असे स्वार्थी राजकारणी, नेते पळ काढतात, गाडीच्या काचा खाली करतात.  कधीतरी त्यांना पण माध्यमांची ताकद, गरज कळुदेना.नेते, मंत्री यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दौरे होतात आणि पत्रकार परिषद होतात. या पत्रकार परिषदेत जनतेच्या प्रश्नांपेक्षा एखादे वादग्रस्त वक्तव्य मिळते का यावर सगळा भर असतो. ही पत्रकारांची चूक आहे आणि अशा बाजारू नेत्यांनाही हेच हवे असते. माध्यमच अशा नेत्यांना सवंग प्रसिद्धी देतात.सध्या जवळजवळ सर्वच हिंदी चॅनेल्स युद्धग्रस्त झालेत. त्या झेलन्स्की आणि पुतीनना जेवढी घाई नाही, गडबड नाही, टेन्शन नाही तेवढे किंबहुना त्यापेक्षा जास्तच यांना दिसते. बिचारे झोपत पण नाहीत. बातम्या देताना, चर्चा करताना किंचाळतात काय, ओरडतात काय, धावतात काय ...काही विचारू नका.टीव्ही चॅनेल्सवरील एकसारखे तेच तेच चेहरे बघून आणि त्यांची भांडणे बघून शिसारी येते. शांतपणे मुद्देसूद चर्चा झाली आणि त्यामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडली तर काय करा अशी भीती त्यांना वाटत असावी.      

या देशात ज्ञान, विज्ञान, संस्कृती (अगदी राजकारणातही) चांगली माणसे नाहीत का, जनतेचे प्रश्न, राज्य देशासमोरील प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, कृती करणारे लोक नाहीत का? की सगळी अक्कल आहे ती केवळ वाचाळ, थिल्लर नेत्यानाच? छोटी वर्तमानपत्रे यांची थोडीशी अडचण समजू शकतो, मात्र बड्या वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सनी एकत्र येऊन किंवा आपापल्या स्तरावर या गोष्टी कशा टाळता येतील किंवा टप्प्याटप्प्याने त्या कमी कशा करता येतील याचा विचार जरूर करावा. ते त्याबाबत सक्षम आहेत. जिल्हा, तालुका स्तरावरील वर्तमानपत्र मालक, संपादक यांनीही अशा बाजारू नेत्यांना, बातम्यांना पहिले पान न देता विधायक, प्रोत्साहित करणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करायला हवा. असा प्रयोग समाजालाही किती आवडतो हेही कळेल. समाजाची रुची, त्याची वैचारिक पातळीही कळेल. म्हणून आज सर्व मालक आणि संपादक मंडळींना या खुल्या पत्राद्वारे वरील आवाहन करीत आहे. समाजानेही अशा चांगल्या बदलांना साथ द्यायला हवी. ती नाही मिळाली तर पत्रकारितेचा स्तर घसरण्यास समाजही तितकाच जबाबदार आहे हेही तितकेच खरे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.