भ्रष्टाचार ७५ टक्क्यांनी कमी करणार !!

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण यांचे ह्रदय स्पर्शी ज्वलंत मनोगत.!

मुंबई (जगदीश काशिकर) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच जल्लोषात साजरा झाला. 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीची एक लाट देशभर उसळली. आजही करोडो भारतीय या लाटेवर स्वार होऊन उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवीत आहेत. या स्वप्नांना साकार करण्यासाठी क्रांतिदिनाचे औचित्य साधून एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेला, निर्धार केला गेला तो म्हणजे भ्रष्टाचार ७५ टक्क्यांनी कमी करण्याचा! देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजे त्याला अनुसरून एखादी नाविन्यपूर्ण योजना, मोहीम घोषित करण्याचा आपल्या प्रधान सेवकांचा गेली आठ वर्षे प्रघात आहे. ' मी खाणार नाही आणि दुसऱ्याला खाऊ देणार नाही 'अशी त्यांची भीष्म प्रतिज्ञा असल्याचे सांगितले जाते. तरीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन ७५ टक्के भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्वजण तयार होतील अशी त्यांना अपेक्षा असावी. 

खरं तर शंभर टक्के भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा आहे , पण तो निर्णय शतक महोत्सवी स्वातंत्र्य दिनासाठी राखून ठेवण्यात आला आहे.शंभर टक्के भ्रष्टाचारमुक्त भारत ही कल्पना उत्तम असली तरी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर एकदम ओझे टाकणे, त्यांच्यावर दडपण येईल असे काही करणे मानवाधिकाराच्या विरुद्ध होऊ शकते म्हणून सध्या ७५ टक्के भ्रष्टाचारमुक्त देशाचा निर्णय झाला आहे. प्रत्येकाच्या मनामनात, नसानसात देशभक्ती उफाळून आलेली असल्याने त्या भावनेतून, त्या जाणिवेतून भ्रष्टाचार ७५ टक्केवर आणण्यास प्रत्येकजण प्रवृत्त झाला आहे असे प्रत्यक्ष अनुभवातून दिसून येत आहे. खरंच मेरा भारत महान आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत ईडी, सीबीआय, आयटी वाल्यांच्या मोहिमांवर मोहिमा चालू आहेत. ७५ टक्के विरोधकांना तरी भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.आपल्यातल्या ७५ टक्के भ्रष्टाचार्यांना यापासून मुक्त करण्याची संधी विरोधी पक्षांचे सरकार आले तर त्यांना मिळावी या उदार भावनेतून आत्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या लिलावाच्या किमती पंचवीस टक्क्यांनी कमी करून पंचाहत्तर टक्क्यांवर आणल्या आहेत. एखादा आमदार किंवा खासदार समजा ५० कोटीला विकला जाणार असेल तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन तो साडे सदतीस कोटींना विकला जाईल. त्यामुळे प्रत्येकी साडे बारा कोटींचा भ्रष्टाचार कमी होईल !!

केंद्रातले वा राज्यातले मंत्री असो, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असोत समजा वर्षाला शंभर कोटी रुपये लाचेतून, टक्केवारीतून खात असतील तर ते आता फक्त ७५ कोटी खातील. यात सर्वच खात्यांचे वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी आले. फक्त आकड्यात कमी जास्त काही होईल इतकेच. यात मंत्रालय, विभागीय, जिल्हा, तालुका, मंडळ , गाव अशा सर्वच पातळीवर हा २५ टक्के सूट देऊन ७५ टक्के लाच खाण्याचा, भ्रष्टाचार करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध सरकारी कार्यालयात गेलेल्या लोकांना हा सुखद अनुभव येऊ लागला आहे. जिथे दहा हजार द्यावे लागत होते तिथे आता साडे सात हजाराची तर जिथे हजार रुपयांची लाच द्यावी लागत असे तिथे साडेसातशे रुपयांत काम होऊ लागले आहे. 

सरकारी कार्यालयातून फायली हलायला पूर्वी जर चार महिने लागत असतील तर ती आता तीन महिन्यांत हलणार आहे. उर्मट अधिकारी, कर्मचारी आता ७५ टक्केच उर्मटपणा करणार आहेत.कामासाठी आलेल्या लोकांशी. कार्यालयात आता किमान ७५ टक्के अधिकारी, कर्मचारी आपापल्या जागेवर काम करत बसलेले दिसतील. फक्त २५ टक्के अधिकारी, कर्मचारी यांना शोधावे लागेल. सर्व प्रकारचे कंत्राटदार ७५ टक्के उत्तम कामांची हमी देऊ लागले आहेत. रस्ते, पूल, कालवे, धरणे या कामातून होणारा भ्रष्टाचार आता ७५ टक्के असेल. पूर्वी एखादा रस्ता केल्या केल्या उखडला जात होता तो आता तीन दिवस तरी टिकेल. एका दिवसांत पडणारा पूल तीन दिवस टिकेल. जिथे शंभर टक्के खड्डे आहेत तो रस्ता आता केवळ ७५ टक्केच खड्ड्यात असेल उर्वरीत पंचवीस टक्के एकदम गुळगुळीत !!

त्याचबरोबर नाना भानगडी करून शासनाला,गोरगरिबांना चुना लावणारे, गोरगरिबांच्या जीवाशी खेळणारे बिल्डर ७५ टक्के चांगल्या बांधकामाची खात्री देऊ लागले आहेत. मोठमोठे राजकारणी, उद्योजक, व्यापारी ७५टक्के तरी करचोरी करणार नाहीत आणि सरकारी तिजोरीवरील भार कमी करतील.थोडक्यात सांगायचे काय आहे तर सर्वांच्या अंगात देशभक्ती संचारली असल्याने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जोश कायम असल्याने देशाला पोखरून काढणारा भ्रष्टाचार पंचवीस टक्क्यांनी कमी करून टाकण्याचा प्रत्येकाचा निर्धार हा खरंच क्रांतिकारी घटना ठरली आहे.सर्व अधिकारी, कर्मचारी आपापल्या पगारात समाधानी आहेत, वर कमाईचा साधा विचारही आता त्यांच्या मनात येत नाही. किती मस्त वाटतं हे सर्व पाहून.लोकशाहीचा चौथा स्तंभही आता केवळ ७५ टक्केच विकला जाऊ शकतो किंवा तेवढाच लाळघोटेपणा करू शकतो. २५ टक्के प्रसारमाध्यमे आणि पत्रकार समतोल विचार करू लागले आहेत ही केवढी मोठी गोष्ट आहे.  

दोन नंबरवाले, गुन्हेगार अशा मंडळींनाही देशप्रेम असल्याने त्यांनीही अमृत महोत्सव लक्षात घेऊन पाप कृत्यांत २५ टक्के घट करून, प्रसंगी नुकसान सोसून ती ७५ टक्क्यांवर आणली आहेत. अर्थात त्यामुळे पोलीस किंवा तत्सम खात्यांना काहीशी आर्थिक चणचण भासू लागली आहे, पण गर्वाची बाब म्हणजे त्यांनी तोही त्याग आनंदाने स्वीकारला आहे. आता पोलीस ठाण्यात जाणाऱ्या शंभर पीडितांपैकी ७५ टक्के लोकांना तरी सौजन्याने वागवले जाते. गावगुंड, दलाल, दोन नंबरवाले यांना आता मानाचे स्थान मिळत नाही. आरटीओवाले पण सुधारलेत, तेथील २५ टक्के दलाल आणि लाचखोरी कमी करण्यात आली आहे. बँका, पतसंस्था, नोकऱ्या लावणारे, अल्पावधीत तिप्पट चौपट देणारे सर्व आता चोख व्यवहार करू लागले आहेत. ते कोणालाही बुडवणार नाहीत अर्थात ७५ टक्के.

पुढाऱ्यांच्या पाठी फिरणारे चमचे, खुर्च्या उचलणारे कार्यकर्ते आता आपला दिवसातला ७५ टक्के वेळ घरच्या कामात, नोकरी व्यवसायात देऊ लागले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी यापुढे होणाऱ्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत शंभर टक्के खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्यापेक्षा २५ टक्के कमी फसवणूक करण्याचा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आणि त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. अर्थात अनेक देश या धक्क्यातून अजून सवरलेले नाहीत. असो. या ऑगस्टमध्ये खूप काही चांगले घडते आहे. उरलेला भ्रष्टाचार शतक महोत्सवी स्वातंत्र्य दिनापर्यंत नावालाही राहणार नाही अशी खात्री वाटते. जय हिंद !!ता.क. यानिमित्ताने देशातील ७५टक्के नागरिकांनी जरी ' मला काय करायचंय..मी,माझी बायको-मुलं' ही प्रवृत्ती सोडली तर सर्वांत मोठी उपलब्धी ठरेल.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.