एन. पी. एस. खाते उघडण्याची सक्ती न करता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे सुरू ठेवा : शिक्षक भारतीची मागणी..!
भद्रावती (ता.प्र.) - राज्यातील एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एनपीएस लागू करून खाते उघडण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफ खाते बंद करून एनपीएस खाते उघडण्याबाबत सक्ती केली जात आहे. एनपीएस खाते उघडणे बाबत शासनाचे किंवा मान्य उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना अशा प्रकारची कारवाई करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे एन पी एस खाते उघडण्याची सक्ती न करता शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार नियमित सुरु ठेवण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे.
सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका क्रमांक 2343/2022 भाऊसाहेब शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांची विशेष अनुमती याचिका लार्जर बेंच मुंबईच्या निकालानंतर ६७४ दिवस उशिराने दाखल झाल्यामुळे व अगोदरचे प्रलंबित मॅटर निकालासाठी विचाराधी नसल्यामुळे सदरची याचिका विलंबाने दाखल या कारणाने निकाली काढली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ च्या निर्णयात इतर बाबीत कोणतेही भाष्य केलेले नाही. सदर निकालाचा आधार घेऊन राज्यातील २६००० कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते उघडण्याची सक्ती करणे न्यायोचित होणार नाही.एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व एक नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाने नेमलेल्या सम्यक समितीच्या अहवाल शासनाकडे सादर झालेला आहे परंतु अद्यापी शासनाने या अहवालाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची याचिका प्रलंबित आहे.असे असताना सर्व कर्मचाऱ्यांना जीपीएफ खाते बंद करून एनपीएस खाते उघडण्याबाबत सक्ती करणे अन्यायकारक ठरेल. उपरोक्त वस्तुस्थितीच्या विचार करून शिक्षण संचालक कार्यालयाकडून दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी काढलेले पत्र रद्द करून तातडीने उचित कारवाई करावी अशा मागणीचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिल्याची माहिती शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे, रावण शेरकुरे, जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, पुरुषोत्तम टोंगे, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार,किशोर दहेकर,राकेश पायताडे,जब्बार शेख, रॉबिन करमरकर, रोहिणी मंगरूळकर, निर्मला सोनवणे , जिल्हा पदाधिकारी शिक्षक भारती आदींनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.