आर्यवैश्य समाजातर्फे श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार व नोटबुक तुला कार्यक्रम संपन्न..!
बल्लारपुर (का.प्र.) - राष्ट्र उभारणीकरिता संघर्ष करणारा, सांस्कृतिक, मानवी मुल्य, नैतिकता व राष्ट्रहित जपणारा सात्वीक व प्रामाणिकपणा जपणारा हा माझा समाज आहे. ज्या मॉं वासवी कन्यका मंदीरात मी लहानाचा मोठा झालो, त्याच मंदीरात माझ्या समाजबांधवांकडून माझा झालेला सत्कार हा बॅंकाक, सिंगापूर येथे झालेल्या सत्कारापेक्षाही मोठा व महत्वाचा आहे. या सत्काराने मला प्रेरणा, ऊर्जा, लढण्याची आणि बदल घडविण्याची शक्ती दिली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी स्थानिक श्री कन्यका देवस्थान सभागृह चंद्रपूर येथे आर्यवैश्य समाज चंद्रपूरतर्फे श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार व नोटबुक तुला करण्यात आली. यावेळी बाजार वार्डातील श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातुन ढोल-ताश्याच्या गजरात, फटक्यांच्या आतीशबाजीत त्यांची मिरवणूक श्री कन्यका देवस्थान सभागृहापर्यंत नेण्यात आली व व्यासपीठापर्यंत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव चकनलवार, श्री माता कन्यका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिलींद कोतपल्लीवार, उपाध्यक्ष संदीप पोशट्टीवार, सचिव राजेश्वर चिंतावार यांची व्यासपीठावर व सहसचिव प्रशांत कोलप्याकवार, कोषाध्यक्ष अजय मामीडवार, राजु सुरावार, उदय बुध्दावार, श्रीराम झुल्लुरवार, महेश कल्लुरवार, अमित कासनगोट्टूवार, गिरिधर उपगन्लावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
९ ऑगस्ट २०२२ ला मी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले, परंतु आजचा सत्कार हा घरचा आहे. प्रिय समाजबांधवांकडून व ज्येष्ठांकडून झालेला माझा सत्कार हा जगातील सर्वात मोठा सत्कार आहे. यामधुन मला प्रेरणा मिळाली, ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळाला. मी आपल्या समाजाचा आशीर्वाद घेऊन इतर सर्व समाजाचे कल्याण करण्याचे संकल्प करून कंकण बांधून घेत आहे. मी ज्या दिवशी मंत्री झालो त्यादिवशी सर्वात पहिले काम करायच्या विकासाकामांची यादी केली. ज्यामध्ये ११४ कामे प्राधान्याने पूर्ण करायची आहेत. आपला आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्या पाठीशी असल्यामुळे अधिकची दिडशे कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करेन, असा मला विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले.५ वर्षाच्या अर्थमंत्री पदाच्या काळात भिमाशंकर देवस्थानाचा विकास, पंढरपूर येथे तुळशी वृंदावन, शिखर शिंगणापूर येथे १२०० विविध जातीच्या बेल वृक्षांची यशस्वी लागवड केली. यामुळे मला कायमच आध्यात्मीक व आत्मीक आनंद मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, कॅन्सर हॉस्पीटल, नियोजन भवन, अजयपूर येथे फॉर्मर्स ट्रेनींग इंस्टीटयुट सेंटर, सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठाची इमारत, एपीजे अब्दुल कलाम गार्डन, बॉटनिकल गार्डन, मुर्ती येथील विमानतळ, सैनिकी शाळा यासारख्या १५४ विकासकामांना पूर्तता देता आली. हे कार्य मला कन्यका मॉ वासवी कन्यका यांच्या आशीर्वादाने करता आले.
आर्यवैश्य समाजाअंतर्गत श्री कन्यका परमेश्वरी ग्रुप चंद्रपूरच्या वतीने यावेळी सत्कार सोहळा व नोटबुक तुला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील गरजू व गरीब बांधवांकरीता विश्वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्याद्वारे कार्यान्वीत १७८ योजनांच्या माध्यमातुन समाजाचा मोठया प्रमाणात विकास करता येईल. शासन कायमच समाजाच्या पाठीशी उभे आहे, असेही श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव चकनलवार म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हा समाजाचा गौरव आहे. यावेळी राजेश्वर चिंतावार, संदीप पोशट्टीवार यांनी व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. मंजुषा भास्करवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत कोलप्याकवार यांनी केले. यावेळी समाजातील अनेक संस्थांनी व समाजबांधवांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वैभव कोतपल्लीवार, मनोज राघमवार, संतोष तुंडूलवार, राजेंद्र आल्लुरवार, शिरीष रेगुंडवार, अखिलेश आईंचवार, चैतन्य पडगिलवार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.