लता मंगेशकर ही या सहस्रकातिल ईश्वराकडून मिळालेली मोठी देणगी : सुधीर मुनगंटीवार
बल्लारपुर (का. प्र.) - "सर्व भावनांचा, भाषेतील प्रत्येक शब्दांचा आशय सुरात प्रकट करणाऱ्या लता मंगेशकर ही या सहस्रकातिल भारताला ईश्वराकडून मिळालेली मोठी देणगी आहे " असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केले . सौ विनीता तेलंग लिखित व हिंदुस्तान प्रकाशन अर्थात साप्ताहिक विवेक ने प्रकाशित केलेल्या रसमयी लता या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित या समारंभास राज्याचे पर्यटन मंत्री श्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ गायक श्री श्रीधर फडके, साप्ताहिक विवेक चे संपादक श्री रमेश पतंगे, श्री दिलीप करंबेळकर मंचावर उपस्थित होते.
श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले कि, लेखिका विनीता तेलंग यांनी लता मंगेशकर यांचा हिमालयाची ऊंची असलेला जीवनपट ती ऊंची कायम ठेवत, भाव कायम ठेवून अत्यंत उत्तम पद्धतीने मांडला आहे. साप्ताहिक विवेक ने सतत समाजात जे जे काही चांगले आहे, उत्तम आहे त्यासाठी मार्गदर्शक व मध्यस्थाची जबाबदारी पार पडली आहे. विवेक असेल तरच समाज जगेल अशी पुष्टीदेखील त्यांनी खास शैलीत जोडली. लता मंगेशकर या भारताची नव्हे तर जगाची शान होत्या, साक्षात सरस्वती असं वर्णन अतिशयोक्ति ठरणार नाही अशी भावना व्यक्त करत लता मंगेशकर यांनी कष्टमय आयुष्य जगत असताना संकटातून आनंदाच्या महामार्गावर जाता येतं ही शिकवण दिली असे ते म्हणाले. 36 भाषांत गाणे ही दैवी देणगी होती असेही श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हल्ली पुस्तक वाचणे कमी झाले आहे, ऐकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार आता ऑडियो बुक तयार करायला हवी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तशी एखादी भारतीय कंपनी पुढे यावी असेही ते म्हणाले. दिलीप करंबेळकर यांनी प्रास्ताविकात विवेक ची भूमिका स्पष्ट केली.पर्यटन मंत्री श्री मंगलप्रभात लोढा आणि गायक श्रीधर फडके यांनीही मनोगत व्यक्त केले.