बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानक नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये .!
चंद्रपूर (वि.प्र.) - बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर रविवारी पादचारी पुल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत एफ.आय.आर. नोंदविण्यात आला असून चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी (रविवारी) रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर सलग दुस-या दिवशीसुध्दा (सोमवारी) पालकमंत्र्यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनला भेट देवून रेल्वे प्रशासनाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, रेल्वे प्रशासनच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, नॅशनल रेल्वे युझर्स कौन्सिलचे सदस्य अजय दुबे,भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे भाजपा महामंत्री चंद्रपूर महानगर, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर हरीश शर्मा, माजी उपमहापौर राहुल पावडे, लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैशाली शिंदे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णा पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, बल्लारपूर स्टेशन प्रबंधक ए.यु.खान, तसे , नीलेश खरवडे, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेची काय सुविधा आहे, याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा करून माहिती घेतली. स्टेशनवरील सध्याचे दोन्ही पुल तातडीने दुरूस्त करून घेण्याचे तसेच नवीन पादचारी पुलाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून तेथे प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करावी, असे त्यांनी निर्देश दिले. तसेच बल्लारपुर व चंद्रपूर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर सीएसआर फंडमधून बॅटरी ऑपरेटेड कार देण्यात येईल. या गाड्यांवर जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळांचे ‘क्यूआर कोड’ विकसीत करावे. जेणेकरून बाहेरून येणा-या नागरिकांना जिल्ह्याची माहिती उपलब्ध होईल. स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या संख्येत वाढ करून ती 40 वरून 60 करण्यात येईल.
आंध्रप्रदेशाकडून येणाऱ्या गाड्यासाठी बल्लारपूर हे महाराष्ट्रातील पहिलेच महत्वाचे रेल्वेस्थानक असून या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे नियोजित प्लॅटफॉर्म वेळेवर बदलत असल्याबाबत प्रवाश्यांची तक्रार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांकाबाबत वेळेवर घोषणा होत असल्याने नागरिकांची धावपळ होते. ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व येणाऱ्या गाडीचा प्लॅटफार्म निश्चित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधीत रेल्वेचे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. चंद्रपूरबाबत विशेष बैठक घेवून ते आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच या बैठकीचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिका-यांना सूचित केले. याप्रसंगी रेल्वे प्रशासनातर्फे गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये व किरकोळ दुखापतग्रस्तांना 50 हजार रुपये रोख अदा करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.बैठकीला जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.