बल्लारपुर (का.प्र.) - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.