जयसिंगपूर येथे शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला .!
जयसिंगपुर (जगदीश काशिकर) - शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
जयसिंगपूर आणि अन्य नगरपालिकांच्या विकासकामांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यात अल्पसंख्याक बांधवांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २५ कोटीचा निधी दिला जाईल. शिरोळ नगरपालिकेसाठी नवीन इमारत बांधण्यास आवश्यक निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला वेगळी आपुलकी असल्यानेच त्यांच्या विकासासाठी यापुढे निर्णय घेतले जातील. आमच्या शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत, गोगलगायमुळे नुकसान झालेल्या पिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले असून अजूनही पंचनामे सुरु आहेत. पंचनाम्यानंतर या शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार असून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर व प्रकाश आबिटकर उपस्थित होते.