मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार .!
मुंबई (जगदीश काशिकर) - ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई हे जगातले सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, फ्लायओव्हर यांच्या सुशोभिकरणाला सुरूवात झाली आहे.
कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे 'मुंबई फर्स्ट' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती शहरे, वातावरणीय बदल यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
‘मुंबई फर्स्ट’ संस्थेचे नरिंदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्विनी ठाकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.