विविध विकासकामांचा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ .!


 ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ .!
ठाणे (जगदीश काशिकर) - ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ आज/शनिवारी करण्यात आला. या विकासकामांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात शहराचे रूप पुरते पालटलेले दिसेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केला.
ठाणे शहरापासून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली, त्यामुळे हे शहर एक सुंदर आणि सुनियोजित शहर व्हावे हे माझे स्वप्न आहे, असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या माध्यमातून याकरिता ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला असून त्या माध्यमातून शहरातील चौकांचे सुशोभीकरण, पुलांची रंगरंगोटी आणि विद्युतीकरण, रस्ते, फूटपाथ यांची डागडुजी आणि सुशोभीकरण, शहर खड्डेमुक्त तसेच सुंदर करण्याचे काम करण्यात येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शहरातील डेब्रिज हटवणे, मंडई परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालयांची नियमित डागडुजी व स्वच्छता ठेवत तिथे केअर टेकर तैनात करणे आदी बाबींना प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. 
शहरामध्ये प्रस्तावित असलेली विकासकामे दर्जेदार व्हायला हवीत तसेच ती करताना ठाणेकर नागरिकांनी देखील आपले शहर सुंदर ठेवण्यासाठी शक्य ते सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ठाणे महानगरपालिकेत आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान केला. 
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, ठाणेमहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, माजी महापौर सौ.मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी विरोधी पक्षनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक नारायण पवार, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, ठाणे महानगरपालिकेतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.