मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगा - डॉ. ज्ञानेश हटवार

न्यायालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' संपन्न .!
बल्लारपुर (का. प्र.) - दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.ज्ञानेश हटवार यांनी 'महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मातृभाषेचा, मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. घरी तसेच व्यवहारात मराठी भाषेतून आग्रही संवाद साधला पाहिजे, तरच मराठी भाषेबद्दलची गोडी नवीन पिढीत निर्माण होईल', असे मार्गदर्शन केले.
दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे शासकीय परिपत्रकाप्रमाणे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष न्यायाधीश, मृगेंद्र बवरे साहेब, प्रमुख मार्गदर्शक डॉ.ज्ञानेश हटवार, प्रा.किशोर ढोक, तालुका अधिवत्ता संघाचे अध्यक्ष राजेंद्र पथाडे उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश मृगेंद्र बवरे साहेब यांनी 'मराठी भाषेत अमृतालाही जिंकण्याचे सामर्थ्य असल्याचे' मत व्यक्त केले. प्रा.किशोर ढोक यांनी 'मराठी भाषेची महती विशद करताना, मराठी भाषेची उज्वल परंपरा सांगत या भाषेचे संवर्धन करण्याची गरज आपल्यावर आहे' असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट मनोज खंडाळकर, सरकारी वकील, भद्रावती यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एडवोकेट विनोद सुरतीकर यांनी केले. कार्यक्रमाला भद्रावती तालुका बारा असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सदस्य, समस्त अधिवक्ता व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संखेत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.