मला आवडलेलं पुस्तक .!

कोरोना संघर्षातील जीवन गाणे - कवी डॉ.रमणिक लेनगुरे नागपूर
बल्लारपुर (का.प्र.) - 'संकटामध्ये संधी' शोधणाऱ्या लोकांमध्ये डॉक्टर लेनगुरे यांचा समावेश करावा लागेल. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन च्या निमित्ताने वर्क फॉर्म होम च्या नावाखाली अनेकांनी घरात बसून पापड तयार केले. पण संवेदनशील लोकांनी आपल्यामध्ये दडलेला लेखक, कवी जागा केला.
भर आमावास्याच्या दिवशी आकाशात चंद्र नसतो तेव्हा अनेक छोटे छोटे तारे सुद्धा प्रकर्षाने दिसू लागतात. लॉकडाऊन मध्ये डॉक्टर लेनगुरे सारखे कवी,लेखक निर्माण होणार असतील तर लॉकडाऊन पुन्हा करायला हरकत नाही. पण, कोरोना यावा असं मला अजिबात म्हणायचं नाही.
नदीच्या प्रवाहात पावसाचे पाणी येऊन मिसळावे तशा कविता कोरोना काळात साहित्यामध्ये आल्या. चांगल्या होत्या त्या प्रवाहाबरोबर राहिल्या, आज त्या समुद्राच्या दिशेने निघाल्या आहेत. बाकीच्या, किनाऱ्यावरील झाडाझुडपात अडकलेल्या पालापाचोळ्यासारख्या तिथेच राहिल्या दिसत आहेत.
डॉ.रमणिक लेनगुरे यांचा 'कोरोना संघर्षातील जीवन गाणे ' या शीर्षकाचा नवा आणि पहिलाच कविता संग्रह प्रवाहामध्ये आलेला आहे. साधी,सोपी, सरळ ओघवती भाषाशैली हे या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
आज अनेकांना अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सूचतात पण, त्या शब्दात मांडता येत नाही. डॉ.लेनगुरे हे नागपूर मधील रेणुका कॉलेजचे ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकांबरोबरच शब्दांचाही अफाट संग्रह त्यांच्याकडे आहे. म्हणूनच पारंपारिक पद्धतीपेक्षा मुक्त होऊन त्यांनी कोरोना काळातील परिस्थिती आणि आपल्याला आलेले अनुभव कवितेमधून मांडले आहे.
कोरोनाच्या पहिल्या,दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोक या जगातून कायमचे निघून गेले.आपण आज अजून आहोत म्हणजे अजून काहीतरी नवीन करून दाखवण्याची संधी परमेश्वर आणि दिली आहे याची जाणीव कवीने करून दिली आहे.
प्रसंग आणि परिणामाची जाणिव करून देणारा हा कवितासंग्रह आशावादी आहे.जगभरात भय,निराशा निर्माण झालेल्या असताना आनंदाने जीवन गाणे गायचे सोपे नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी काम केले त्या पोलीस ,डॉक्टर ,नर्स ,सेवक त्याचबरोबर अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. कवी म्हणतात,
' जिथे कृतीची पाऊले दिसतील 
त्यांच्यावर फुले उधळणार आहे. '
निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे निसर्गावर मात करण्याची माणसाची चाललेली धडपड घातक आहे त्यामुळे कोरोने एक धडा शिकवला आहे. पण आज पुन्हा माणसाला विसर पडू लागला आहे हे घातक आहे हे कवी सांगतो आहे.
'तुला आयुष्याच्या वाटेवर निवांत पण संथ चालावे लागेल 
लॉकडाऊन संपल्यानंतर
जपून पाऊल टाकावे लागेल '
कवी सांगतात सावध व्हा.जगा. ' तुम्ही फक्त लॉकडाऊन चे पालन करा. हे ही क्षण निघून जातील. '
कवितेच्या माध्यमातून कविने अनेक उपाययोजना सांगितले आहे.यदा कदाचित पुन्हा लॉकडाऊन झाले तर निश्चितच त्या मार्गदर्शक ठरतील.विषयाला अनुसरून बनवलेले मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. चांगला कागद उत्कृष्ट छपाई मजबूत बिल्डिंग आहे. खरोखरच कवी डॉ रमणिक लेनगुरे व पुस्तकाचे प्रकाशात डॉ. सुनील पाटील यांचे हार्दिक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
पुस्तक : कोरोना संघर्षतील जीवन गाणे ( कवितासंग्रह )
कवी : डॉ.रमणिक लेनगुरे, रेणुका कॉलेज,नागपूर..
संपर्क : 9420869043
...
शब्दांकन
मनोहर भोसले (मनुदा ) सैनिक टाकळी

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.