निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ..!
मराठी भाषेच्या संवर्धना करिता साहित्य निर्मितीची गरज - डॉ. ज्ञानेश हटवार
बल्लारपुर (का. प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रमुख वक्ते यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अपर्णा धोटे व प्रा. डॉ. नरेंद्र हरणे व कार्यक्रमाच्या आयोजक प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. या प्रसंगी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी सर्वप्रथम मराठी भाषा संवर्धन पंधराव्या निमीत्त मराठी भाषा जशी संतांनी जपली , त्यांचे संवर्धन करीत त्यांचा प्रचार व प्रसार केला व ती वाढविली, हे त्यांनी विविध उदाहरणातून स्पष्ट केले. मराठी आपली मातृभाषा असून ती वापरताना आपणास गोडवा व मृदुपणा अनुभवतो. आपण मराठी भाषेमुळे विविध ग्रंथाची निर्मिती करू शकतो . आपण आपली भाषा वापरताना शब्दांचा वापर व्यवस्थित करावा , जेणेकरून कुणीही दुखी होऊ नये. तसेच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर जसे देशाचे भविष्य आहे, तसेच मराठी भाषा संवर्धन करण्याचे सुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. आपण काळानुसार परिवर्तित होत असलो तरी आपल्या मराठी भाषेवरचे प्रेम कमी होता कामा नये, असे आवाहन केले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा न्युनगंड दूर करावा . राष्ट्रभाषे सोबतच मातृभाषा जतन करणे आवश्यक आहे. मराठी भाषा मागे पडता कामा नये त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ,असे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नरेंद्र हरणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. सचिन श्रीरामे , प्रा. कुलदिप भोंगळे, तेलंग यांनी अथक परिश्रम घेतले . या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.