नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक: झाडे- गाणार- अडबाले यांच्यात सामना .. ‘झाडे’ आडवे आलेत, ‘अडबाले’ आता ‘गाणार’ नाहीत ..!
शिक्षक मतदार संघ : चंद्रपूर वगळता नागपूरसह सर्वच जिल्ह्यात राजेंद्र झाडे पुढे
भद्रावती (ता. प्र.) - नागपूर शिक्षक मतदार संघासाठी गडचिरोली येथे 30 जाने. सकाळी ७ पासून तर अन्य जिल्ह्यांत सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या माहितीनुसार तिसऱ्यांदा नशीब आजमावणारे शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र बाबुराव झाडे हे चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यात मुसंडी मारत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘झाडे’ आडवे आल्याने ‘अडबाले’ आता ‘गाणार’ नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. यांच्यात खरी लढत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नागपूर शिक्षक मतदार संघातून भाजपचा पाठिंबा असलेले शिक्षक परिषदेचे ना. गो. गाणार हे तिसऱ्यांदा उमेदवार आहे. ते गेले दोनवेळा आमदार आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले हे उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. तर आमदार कपील पाटील यांच्या शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. गाणार हे याआधी दोन वेळा आमदार असल्याने व त्यांच्यावर मतदार नाराज असल्याने त्यांना तिकिट देऊ नये अशी भाजपच्या गोटातून मागणी होती. परंतु गाणार यांनी अर्ज भरल्यानंतर माघार घ्यायला तयार नसल्याने भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजपात असंतोष खदखदत होता. त्याचा परीणाम मतदानावर झाला. अडबाले हे चंद्रपूरचे आहे. त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविला असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्याकडे पाठ फिरवली तर कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजेंद्र झाडे यांना पाठिंबा दर्शवला व त्यांचा प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे या महाविकास आघाडीत आधीच बिघाडी झाली. तसेच या आधी दोन्ही पक्षांनी पेंशन चा मुद्दा सोडवला नाही त्या मुळे दोन्ही पक्ष चोर चोर मावस भाऊ असी स्थिती अनुभवली आहे. राजेंद्र झाडे यांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव दीर्घ आहे. ते गेले २५ वर्षे पूर्व विदर्भातील मतदार आणि शिक्षण संस्थांशी जुळून होते. २०१० मध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर होते. तर २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.
जिल्हानिहाय मतदारया मतदार संघात ३९ हजारांपेक्षा अधिक मतदान आहे. त्यातील ५० टक्के मतदान हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहे. जवळपास ७ हजार मते चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. उर्वरित मते वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. गाणार व झाडे हे नागपूरचे असल्याने या दोघांमध्ये थेट लढत होणार असे चित्र होते. परंतु गाणार हे तिसऱ्यांदा उभे असून दुसऱ्या वेळेस निसटत्या मतांनी झाडेंना हरवत निवडणूक जिंकले होते. इकडे चंद्रपूर वगळता अडबालेना अन्य जिल्ह्यांमध्ये ओळख नाही. त्यांचा संघटनात्मक कार्य फारसा प्रभावी नसल्याने ते इतर जिल्ह्यात अपरिचित होते. याचा फायदा राजेंद्र झाडेंना मिळत आहे.
"नागो गाणार कॉंग्रेसचे अंतर्गत राजकारण" -
नागपूर पदवीधर मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांना यावेळी पाठिंबा द्या, शिक्षक मतदार संघाच्यावेळी आम्ही शिक्षक भारतीच्या उमेदवारास पाठिंबा देऊ असे आश्वासन शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील यांना कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार, आ. विकास ठाकरे, बबनराव तायवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परवानगीने दिले होते. परंतु शिक्षक भारतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र झाडे यांची घोषणा झाली तेव्हा नाना पटोले यांनी राजकारण करीत चंद्रपूरचे अडबाले यांना पाठिंबा दर्शवला व ते महाविकास आघाडीचे समर्थन असलेले उमेदवार असल्याचे सांगितले. याला कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी विरोध करीत आमचा पाठिंबा झाडे यांनाच असल्याची पत्रकार परिषदच घेतली. तेव्हापासून ते झाडे यांचा प्रचार करीत होते. चंद्रपूरचे खा. बाळू धानोरकर यांच्याच प्रयत्नाने अडबाले यांना पटोले यांच्याकडून पाठिंबा मिळविण्यात यश आले. परंतु जेव्हा अडबाले हे चंद्रपूरशिवाय अन्य ठिकाणी हातपाय पसरू शकत नसल्याचे दिसताच त्यांनीही यातून लक्ष काढून घेतले होते. सध्या अडबाले एकाकी पडले आहेत काय हे ऊद्याच निकाल लागल्यावर कळेल.
"भाजपचा मावळलेला उत्साह" -
गाणार यांना भाजपचा पाठिंबा असला तरी गडकरींचा माणूस म्हणून त्यांना फटका बसणार आहे असे बोलले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही गाणारच्या प्रचाराला जाणार नाही अशीच भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. गाणारांची यावेळी स्थिती चांगली नसल्याचे दिसताच गडकरींनीही गाणारांकडे पाठ फिरवली आहे. गाणार पडले तरी चालतील परंतु अडबाले निवडून येऊ नये म्हणून भाजपचे काही नेते राजेंद्र झाडेंच्या प्रचाराला लागल्याचे चित्र होते. आता त्याचा परिणाम सर्वच १२४ बूथवर दिसून येत आहे. त्यातील ४३ बूथ एकट्या नागपूर जिल्ह्यात आहेत.
"राजेंद्र झाडेंचे राजकारण" -
याआधी दोन वेळा तुम्ही मला निवडून दिले नाही. यावेळी मते दिले नाही तर ही माझी शेवटची निवडणूक असेल असे मतदारांना गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे कळकळीचे आवाहन करीत आहेत. ते म्हणतात, माझे वडील बाबुराव झाडे यांचे संपूर्ण आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेले. ते जिल्हाध्यक्ष होते. ६० वर्षे त्यांनी कॉंग्रेसची सेवा केली. परंतु पटोलेंनी जातीय राजकारण करीत ऐनवेळी दगा दिला. परंतु राष्ट्रवादीचे, शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेतेही माझा प्रचार करीत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. यावेळी माझा विजय हमखास होईल असे ते दाव्याने सांगतात. प्रत्येक मतदान केंद्रावर मीच आघाडीवर असल्याचा अंदाज घेतल्याचे त्यांनी सांगितले.
"सुधाकर अडबाले जातीय राजकारण" -
अडबाले हे कुणबी समाजाचे आहे. आपला माणूस म्हणून खा. धानोरकरांनी ओळख करून देताच माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेसमधील अन्य नेत्यांनी अडबाले कडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर याच समाजातील आशिष देशमुख यांनी बंडाची भूमिका घेतली. गाणार हे माळी समाजाचे आहेत. त्यामुळे भाजपला सतत साथ देणाऱ्या तेली समाजालाही जात आठवायला लागली. बावनकुळे एकदम गप्प बसले. खा. रामदास तडस आणि अन्य नेत्यांनीही ‘जातीवंत’ व्हा म्हणून प्रचार केल्याचे कळते. त्यामुळे तेली समाजाचे झाडे यांचे पारडे जड असल्याचे बोलल्या जाते. उमेदवारांनी कितीही दावे केलेत तरीही झाडे- गाणार- अडबाले अशी त्रिकोणी लढत होणार यात शंका नाही. परंतु ‘ऑखो देखा हाल’ पाहता उमेदवार नागपूरचाच निवडून यावा या मानसिकतेत शिक्षक मतदार दिसून येत होते. यातील उस्तुकता आता सीगेला पोहचली असुन प्रत्येक उमेदवार मीच निवडून येणार असा दावा करत आहेत . मात्र यातील एकच उमेदवार निवडून येणार हे सत्य आहे.