बल्लारपूर (का. प्र.) - बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी विचारपीठावर अध्यक्षस्थानी म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. किशोर चौरे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे ,प्रा.दीपक भगत, प्रा. ताहीर सर इत्यादींची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. पल्लवी जुनघरे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणावर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर चौरे आपले विचार प्रतिपादन करतांना म्हणतात की,छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करीत असतांना अनेक परकीय शत्रू सोबत लढावे लागले त्याहीपेक्षा जास्त आप्तीयांसोबत लढावे लागले, ह्या सर्वांवर यशस्वीरित्या मात करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट प्रशासन केले. त्यांनी आपल्या अष्ठप्रधान मंडळात बहुजन समाजातील लोकांना स्थान दिले, त्यांना विविध उच्च पदावर नेमले. अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिपक भगत यांनी केले तर आभार प्रा. ताहीर सर यांनी मानले, कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.