कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद .!
भद्रावती (ता.प्र.) - दिनांक 17 मार्च 2023, म्हणजे दिनांक 14 मार्च पासून सुरू झालेल्या बेमुदत संपाचा चौथा दिवस सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भद्रावती तहसील कार्यालयात पाळला गेला.
चार दिवसापासुन सतत तहसील कार्यालय, भद्रावती येथे सर्व विभागातील कर्मचारी संपाच्या मंडपात एकत्र येतात. तहसील कार्यालय च्या प्रांगणात 4 थ्या दिवसास सुरुवात झाली. सदर संपाच्या दिवशी भद्रावती शहरातील विविध विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवीत केलेल्या घोषणाबाजीने तहसील कार्यालय नजिकचा परिसर दुमदुमला.
त्यानंतर आजच्या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले ते श्री.राखुंडे सर, श्री पिंपळकर सर व श्री खिरटकर सर यांनी सादर केलेले विडंबन कीर्तन, राखुंडे सरांचे एकपात्री नाटक व उपस्थितांची घोषणाबाजी, महिला कर्मचारी भगिनींनी सादर केलेले पेन्शन गीत. आज शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष व राज्य कार्यकारीनी सदस्य श्री. विनोद पांढरे यांनी मंडपाला भेट दिली व शिक्षक परिषदेचा या संपाला पाठिंबा जाहीर केला. जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण न करता ताबडतोब विविध विभागातील रिक्त पदे तात्काळ भरून वेतनविषयक त्रुटी दूर कराव्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासह इतर एकूण 17 मागण्यांसाठी पुकारलेल्या संपातुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सर्व विभागाचे सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.